सिडनी, 10 ऑक्टोबर : टीम इंडिया (Team India) नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे फेब्रुवारी महिन्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा असेल. कोरोना काळातल्या या दौऱ्यात टीम इंडियाचा ब्रिस्बेनमधला क्वारंटाईनचा कालावधी कमी करावा, अशी मागणी बीसीसीआय (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केली होती. पण ही मागणी फेटाळली जाण्याची शक्यता आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या ऑस्ट्रेलियातल्या वृत्तपत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना मैदानात उतरण्याआधी दोन आठवडे क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात भारतीय खेळाडूंना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. बीसीसीआय मात्र क्वारंटाईन कालावधी कमी करण्यासाठी आग्रही आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये आलेल्या वृत्तानुसार 'क्वीन्सलँडचे आरोग्य अधिकारी क्रिकेटमधल्या सगळ्यात शक्तीशाली देशाला राष्ट्रीय प्रोटोकॉलमधून सूट देणार नाहीत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजूनही या दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा केली नाही. भारतीय खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी कमी व्हावा आणि खेळाडू हॉटेलमध्ये बंद राहण्यापेक्षा जैव सुरक्षिततेमध्ये त्यांनी सराव करावा, असं बीसीसीआयला वाटत आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली जुलै महिन्यात म्हणाले होते, 'क्वारंटाईन कालावधी कमी केला जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. खेळाडू दोन आठवडे हॉटेलमध्ये बंद राहू नयेत, असं आम्हाला वाटतं. हे खूप निराशाजनक असेल.'
10 नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू, प्रशिक्षक, सहकारी आणि कुटुंबाचे सदस्य यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याची परवानगी बीसीसीआयने मागितली आहे. भारतीय टीम 23 ते 25 खेळाडूंसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये टेस्ट टीममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी यांच्यासोबतच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकारी दुबईमध्येच सहा दिवस क्वारंटाईन होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिले मर्यादित ओव्हरची सीरिज आणि मग टेस्ट मॅचची सीरिज होईल, असं सांगितलं जात आहे.