पुणे, 29 मार्च : भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने टी20 आणि वन-डे मालिकेत (India vs England) जोरदार पुनरागमन केलं. इंग्लंडच्या विरुद्धच्या मालिकेत शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या नंतर भुवनेश्वरनं सर्वात जास्त 6 विकेट्स घेतल्या. तो या मालिकेत सर्वात कंजूष बॉलर ठरला. त्याने केवळ 4.65 च्या इकॉनॉमी रेटनं रन दिलं.
या कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारचं लक्ष्य टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं हे आहे. या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना भुवनेश्वरनं सांगितलं की, 'माझं लक्ष्य आता रेड बॉल क्रिकेट आहे. मी टेस्ट क्रिकेट डोळ्यासमोर ठेवून तयारी करणार आहे. पुढील टेस्ट सीरिजसाठी कशा प्रकारची टीम निवडली जाईल हे मला माहिती नाही, पण माझी तयारी त्याच उद्देशानं असेल,' असं भुवनेश्वरनं स्पष्ट केलं.
'आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंट आणि सराव करताना मी टेस्ट क्रिकेटचा विचार करणार आहे. यापुढील काळात अनेक टेस्ट मॅच होणार आहेत. हे मला माहिती आहे. माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट ही सर्वोच्च प्राथमिकता असेल. टेस्ट सीरिजसाठी तयार होण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.
मी बराच काळ अनफिट होतो. आता मला पूर्णपणे फिट होण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतील. आम्हाला या वर्षी इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी स्वत:ला फिट ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे,' असं भुवनेश्वरने सांगितलं.
भुवनेश्वरला दुखापतींचं ग्रहण
टीम इंडियाचा प्रमुख बॉलर असलेल्या भुवनेश्वरच्या कारकीर्दीला दुखापतीचं ग्रहण आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून दुखापतींचा सामना करत आहे. पाठदुखी, स्नायू दुखावणं, कंबरेच्या खालील भागाला दुखापत यामुळे तो क्रिकेटपासून दूर होता. मागील वर्षी आयपीएल स्पर्धेतून त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध 2019 साली टी 20 सीरिज देखील भुवनेश्वर खेळू शकला नाही. तसंच ऑस्ट्रेलियामध्ये 2018 साली झालेल्या दौऱ्यातही तो पूर्ण फिट नव्हता.
(वाचा - IND vs ENG : 'मॅन ऑफ द मॅच', 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारावर विराटची नाराजी )
तीन वर्षांपूर्वी खेळली टेस्ट
भुवनेश्वरनं शेवटची टेस्ट मॅच जानेवारी 2018 साली खेळली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या त्या टेस्टमध्ये भुवनेश्वरने चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुखापतीमुळे एकही टेस्ट खेळू शकलेला नाही. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील चांगल्या कामगिरीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची आशा भुवनेश्वरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, IPL 2021