त्रिशतक हुकल्यामुळे रोहितच्या 264 रनच्या खेळीवर नाराज होती ही व्यक्ती

त्रिशतक हुकल्यामुळे रोहितच्या 264 रनच्या खेळीवर नाराज होती ही व्यक्ती

आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) ने वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरला गवसणी घातली होती. 6 वर्षांनंतर आजही रोहितचा हा स्कोअर अजूनही वनडे क्रिकेटमधला सर्वाधिकच आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) ने वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरला गवसणी घातली होती. 6 वर्षांनंतर आजही रोहितचा हा स्कोअर अजूनही वनडे क्रिकेटमधला सर्वाधिकच आहे. 13 नोव्हेंबर 2014 ला श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये रोहितने 264 रन केल्या होत्या. रोहितच्या या खेळीमध्ये 33 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. भारतीय टीमने हा सामना 153 रननी जिंकला होता. श्रीलंकेच्या टीमला एकट्या रोहित शर्माने केलेल्या 264 ची धावसंख्याही पार करता आली नव्हती. रोहित शर्माने या खेळीने अनेक विक्रम मोडले होते. जगातील प्रत्येक दिग्गज त्याच्या या खेळीचं कौतुक करत होता, पण टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक अशी व्यक्ती होती जी रोहित शर्माच्या 264 रनच्या खेळीवर नाराज होती.

डंकन फ्लेचर माझ्या या खेळीवर समाधानी नसल्याचं रोहितने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. मी एवढा स्कोअर करून आल्यानंतरही टीमचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर (Duncan Fletcher)  ड्रेसिंग रुममध्ये असमाधानी दिसत होते. तुला 300 रन करण्याची संधी असल्याचं फ्लेचर म्हणाल्याची प्रतिक्रिया रोहितने दिली.

रोहित शर्माने त्या मुलाखतीत सांगितले की त्या सामन्याआधी तो खूप घाबरला होता. बोटाला झालेल्या दुखापतीनंतर तो टीममध्ये पहिल्यांदा परतला होता त्यामुळेच तो फारच चिंताग्रस्त होता.

वनडेमध्ये ट्रिपल सेंचुरीचं रोहितचं लक्ष्य

रोहित शर्माने मुलाखतीत सांगितले की तो जिथे जायचा तिथे प्रत्येक जण त्याला हेच विचारायचा की तू 300 रनची खेळी कधी खेळणार. जेव्हा तो विमानतळ किंवा मैदानावर जातो तेव्हा प्रत्येक जण त्याला हेच विचारतो की तू 300 रन कधी करणार? त्यावरती रोहित शर्मा म्हणाला की आता तरी हे कठीण आहे. पण मी 300 रन करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.

रोहित शर्माला मिळाले जीवनदान

264 रनची खेळी करताना रोहितला 4 रनवर एक जीवनदानही मिळालं होतं. थिसारा परेराने तिसऱ्या स्लिपमध्ये रोहितचा कॅच सोडला होता. यानंतर रोहितने आणखी 260 रन केल्या होत्या. रोहितने त्याचे शतक 100 बॉलमध्ये पूर्ण केलं, त्यानंतर पुढच्या 73 बॉलमध्ये त्याने तब्बल 164 रन केले. रोहित शर्माचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा सुद्धा जास्त होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे दुसरं द्विशतक होतं आणि हा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्यानंतर रोहित शर्माने वन-डे क्रिकेट स्पर्धेतमध्ये आणखीन एक द्विशतक झळकावले होते.

Published by: Shreyas
First published: November 13, 2020, 7:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या