मुंबई, 1 नोव्हेंबर: क्रिकेट विश्वात बलाढ्य समजली जाणारी टीम इंडिया या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) कागदी वाघ ठरत आहे. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं (India vs Pakistan) वर्ल्ड कप स्पर्धांमधील 29 वर्षांच्या पराभवाची साखळी तोडली. टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं आयसीसी स्पर्धेतील 18 वर्षांची परंपरा (India vs New Zealand) कायम ठेवत 8 विकेट्सनं विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी उरलेल्या तीन्ही मॅच मोठ्या फरकानं जिंकाव्या लागतील. त्याचबरोबर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला तरच टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये एकतर्फी पराभव झालेली भारतीय टीम आता फक्त आशावादाच्या जोरावर स्पर्धेत आहे.
भारतीय टीमच्या या स्पर्धेतील कामगिरीचा सर्वात मोठा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बसण्याची चिन्हं आहेत. विराटच्या या स्पर्धेतील निर्णयावर सध्या जोरदार टीका होत आहे. विशेषत: न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये बॅटींग ऑर्डरमधील बदलाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियानं सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला (Ishan Kishan) प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. इशान ओपनिंगला खेळणार असं विराटनं टॉस दरम्यानच सांगितलं होतं. फक्त 3 आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव असलेल्या इशानला नव्या बॉलवर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि टीम साऊदी (Tim Southee) या स्विंग बॉलर्सचा सामना करावा लागला. इशानला या मॅचमध्ये कमाल करता आली नाही. तो बोल्टच्या बॉलिंगवर फोर मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला.
विराटच्या हट्टामुळे झाला टीम इंडियाचा पराभव! कॅप्टनच्या निर्णयांची चर्चा तर होणारच
विराट कोहलीनं इशानला टॉप ऑर्डरमध्ये खेळवण्यासाठी रोहितला तीन नंबरवर खेळण्याचा आश्चर्यजनक निर्णय घेतला. रोहित 14 बॉलमध्ये 14 रन काढून आऊट झाला. त्यामुळे मिडल ऑर्डरवरील दबाव आणखी वाढला. रोहितचा ओपनर म्हणून दमदार रेकॉर्ड आहे. त्यानं 113 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचपैकी 80 मॅचमध्ये ओपनिंग केली आहे. त्यामध्ये त्यानं 2404 रन केले असून टी20 क्रिकेटमध्ये 4 शतकही झळकावली आहेत.
हे बदल अपयशाच्या भीतीमधून झाले आहेत का? असा प्रश्न टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकरांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रोहितला तीन नंबरवर बॅटींगला पाठवणे म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवल्याचा दावा त्यांनी केला आहे. टी20 टीमचा कॅप्टन म्हणून विराटची ही शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेतही विराटच्या चुका आणि त्याचा हट्ट टीमला महाग पडत असल्याचं दिसत आहे.
T20 World Cup: टीम मॅनेजमेंटचा रोहित शर्मावर विश्वास नाही! गावसकरांचा खळबळजनक दावा
भारतीय टीमच्या या खराब कामगिरीचं मुल्यमापन होईल तेव्हा विराट कोहलीची वन-डे टीमची कॅप्टनसी देखील जाण्याची दाट चिन्हं आहेत. टी20 आणि वन-डे या दोन्ही टीमची जबाबदारी एकाच खेळाडूकडं सोपवण्यावरही निवड समिती शिक्कामोर्तब करु शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Virat kohli