मुंबई, 3 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पहिल्या दोन मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमच्या या कमगिरीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. भारतीय टीममधील बॅटर्स आणि बॉलर्स यांनी आत्तापर्यंत साफ निराशा केली आहे. टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) खळबळजनक आरोप केला आहे.
अख्तरनं 'स्पोर्ट्सकीडा' शी बोलताना हा आरोप केला आहे. टीम इंडियाची विभागणी दोन गटामध्ये झाली आहे. एक गट विराट कोहलीसोबत आहे, तर दुसरा त्याच्या विरुद्ध आहे. टीममधील या विभागणीचा परिणाम खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीवर होत आहे, असा आरोप त्यानं केलं आहे.
'या टीमची दोन गटामध्ये विभागणी झाली आहे, असं मी पाहत आहे का? एक घटक विराट कोहली सोबत आहे, तर दुसरा त्याच्या विरुद्ध आहे. हे स्पष्टपणे दिसत आहे. टीममध्ये विभागणी झाली आहे. मला माहिती नाही हे असं का होत आहे, पण कॅप्टन म्हणून कोहलीचा हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे, हे देखील याचं कारण असू शकतं. विराटनं चुकीचे निर्णय घेतले असतील, पण तो एक महान क्रिकेटपटू आहे. त्याचा सर्वांनी आदर करायला हवा,' असं मत शोएबनं व्यक्त केलं आहे.
स्कॉटलंडनं मॅच जिंकली तर टीम इंडियासाठी उघडणार सेमी फायनलचे दार!
शोएबनं यावेळी न्यूझीलंडच्या मॅचमधील टीम इंडियाच्या खेळावरही टीका केली आहे. 'त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध खराब क्रिकेट खेळलं. त्यावर टीका व्हायला हवी. टॉस हरल्यानंतर प्रत्येकाच्या माना झुकल्या होत्या. काय घडत आहे, त्याची त्यांना कल्पना नव्हती. तुम्ही त्यावेळी फक्त टॉस हरला होता, मॅच नाही. ते फक्त तिथं खेळत होते. त्यांचा कोणताही गेम प्लॅन नव्हता.' अशी टीका शोएबनं यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india