दुबई, 11 नोव्हेंबर: 100 पेक्षा जास्त टेस्ट इनिंग, 6 हजारपेक्षा जास्त रन, 51.53 ची सरासरी...ही आकडेवारी जगातील सर्वात धोकायदाक ओपनिंग जोडींमधील एक असलेल्या मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) आणि जस्टीन लँगर (Justin Langer) या जोडीची आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोडीची जगभरातील बॉलर्समध्ये दहशत होती. त्यांनी बराच काळ एकमेकांना साथ दिली. या जोडीनं एकत्र 6 हजार 81 रन बनवले. यामध्ये 14 शतकी पार्टनरशिपचा समावेश आहे. एकेकाळी एकत्र खेळणारी ही जोडी आज (गुरुवार) एकमेकांना हरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.
या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) हेडन पाकिस्तानचा बॅटींग सल्लागार आहे. तर लँगर ऑस्ट्रेलियाचा हेड कोच आहे. दोघांच्या टीम पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) दुबईत होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आमने-सामने असतील. पाकिस्ताननं या स्पर्धेत चांगली कामगिरी करत ग्रुप 2 च्या सर्व मॅच जिंकल्या आहेत. पाकिस्तानची बॅटींग या स्पर्धेत चांगली झाली असून त्याचं श्रेय हेडनला दिलं जात आहे.
दुबईचं मैदान हे पाकिस्तानचं 'होम ग्राऊंड' आहे. या मैदानात पाकिस्तानला हरवण्यासाठी लँगरला विशेष डावपेच अखावे लागतील. तर ऑस्ट्रेलियानं ग्रुप 1 मध्ये एक पराभव सहन केला असला तरी त्यांची टीमही फॉर्मात आहे. आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरला सूर गवसला आहे. तर दुसरिकडं पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि अॅडम झम्पा यांचा सामना कसा करायचा याचा मंत्र हेडन पाकिस्तानच्या टीमला देणार आहे. लँगर 2018 पासून ऑस्ट्रेलिया टीमचा कोच आहे. तर हेडननं या स्पर्धेपूर्वी मिसबाह उल हकनं राजीनामा दिल्यानंतर पदभार स्वीकारला आहे.
PAK vs AUS Dream11 Team Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य
3 तास विसरणार मैत्री
मी आणि हेडन 3 तास मैत्री विसरणार असल्याचं लँगरनं सांगितलं आहे. आम्ही दोघेही व्यावसायिक आहोत. आमचं लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. त्यामुळे तीस तास आम्ही मैत्री विसरणार असल्याचं त्यानं सांगितलं.
जस्टीन लँगरनं ऑस्ट्रेलियाकडून 105 टेस्टमधील 182 इनिंगमध्ये 7696 रन काढले आहेत. तर 8 वन-डे मॅचमध्ये 160 रन काढले. त्यानं 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर हेडननं 103 टेस्टमध्ये 184 इनिंगमध्ये 8625 रन काढले तर 161 वन-डे मॅचमध्ये 6133 रन काढले होते. हेडन 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Pakistan, T20 world cup