मुंबई, 6 नोव्हेंबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (ICC T20 World Cup 2021) सध्या रंगतदार स्थितीमध्ये आहे. ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) टीमसाठी आजचा दिवस (शनिवार) महत्त्वाचा आहे. या गटातील इंग्लंडनं अद्याप 4 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची सेमी फायनलमधील जागा नक्की आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकापैकी एकालाच आज सेमी फायनलचं तिकीट मिळणार असून दुसऱ्या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
ग्रुप 1 मध्ये इंग्लंड 8 पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या टीम 6-6 पॉईंट्ससह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंका 4 पॉईंट्ससह चौथ्या, वेस्ट इंडिज 2 पॉईंट्ससह पाचव्या तर बांगलादेश शून्य पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी कशी आहे ते पाहूया
ऑस्ट्रेलिया: बांगलादेशच्या मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाचा रनरेट -0.627 होता. पण बांगलादेशला मोठ्या फरकानं हरवल्यानं ऑस्ट्रेलियाचा रनरेट 1.031 इतका झाला आहे. त्यामुळे सध्या पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यास त्यांची सेमी फायनलमधील जागा जवळपास नक्की होईल.
ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज विरुद्ध पराभूत झालं तरीही त्यांना सेमी फायनलचं तिकीट मिळू शकतं. पण त्यासाठी इंग्लंडनं शेवटच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणे आवश्यक आहे.
दक्षिण आफ्रिका: ऑस्ट्रेलियापेक्षा दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनलचा मार्ग अधिक खडतर आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे पॉईंट्स सारखे आहेत. पण आफ्रिकेचा रनरेट कमी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडवर नुसता विजय मिळवून चालणार नाही, तर त्यांचा रनरेट देखील ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला करावा लागेल.
वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकानं पराभूत केलं तर दक्षिण आफ्रिकेचा मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या शनिवारी होणाऱ्या मॅचनंतर ग्रुप 1 मधून इंग्लंडसह सेमी फायनलला जाणारी दुसरी टीम नक्की होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, South africa, T20 world cup