मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) मोठ्या अपेक्षेनं दाखल झालेली बांगलादेशची (Bangladesh) टीम मोठ्या संकटात सापडली आहे. त्यांचं या स्पर्धेतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ओमान आणि स्कॉटलंड या टीमनं बांगलादेशची अडचण वाढवली आहे. आता आज (गुरुवारी) होणारी पात्रता फेरीतील मॅच मोठ्या फरकानं जिंकली नाही तर बांगलादेशची टीम स्पर्धेतून आऊट होणार आहे.
बांगलादेश आणि ओमान या दोन्ही टीमचे सध्या 2-2 पॉईंट्स आहेत. पण रनरेटमध्ये ओमानची स्थिती ही बांगलादेशपेक्षा चांगली आहे. त्यामुळे गुरुवारच्या मॅचमध्ये ओमाननं स्कॉटलंडला हरवले तर ती टीम सुपर 12 मध्ये दाखल होईल. त्यानंतर बांगलादेशला सुपर 12 मध्ये प्रवेश करण्यासाठी पापूआ न्यू गिनीवर मोठा विजय मिळवावा लागेल.
स्कॉटलंड विरुद्ध ओमानचा पराभव झाला तर बांगलादेशचा मार्ग सोपा होईल. त्यांना शेवटच्या मॅचमध्ये फक्त विजय मिळवावा लागेल. पापूआ न्यू गिनीची टीम स्पर्धेतून जवळपास बाहेर पडली आहे. ग्रुप B मधून स्कॉटलंड, ओमान आणि बांगलादेश या 3 टीम पुढच्या फेरीत जाण्याच्या शर्यतीत आहेत. सध्या स्कॉटलंड 4 पॉईंट्ससह नंबर 1 वर आहे. पण शेवटत्या मॅचमध्ये त्यांचा ओमान विरुद्ध पराभव झाला आणि बांगलादेशनं पापूआ न्यू गिनीला हरवलं तर तीन्ही टीमचे प्रत्येकी 4 पॉईंट्स होतील. त्या परिस्थितीमध्ये नेट रन रेटच्या आधारावर टॉपच्या 2 टीम पुढच्या फेरीत दाखल होतील.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडची होणार IPL 2022 मध्ये एन्ट्री?
या 3 टीममध्ये ओमानचा रनरेट 0.613 इतका आहे. सुपर 12 मध्ये दाखल होण्यासाठी त्यांना फक्त 1 विजय हवा आहे. पण ओामानला स्कॉटलंड विरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही. स्कॉटलंडनं या स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले असून त्यांनी बांगलादेशचा पहिल्या मॅचमध्ये पराभव केला आहे. स्कॉटलंडचा रन रेट 0.575 असून बांगलादेशचा रनरेट 0.500 आहे. या परिस्थितीमध्ये ओमान आणि बांगलादेशनं मोठे विजय मिळवले तर स्कॉटलंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे तीन्ही टीमसाठी आज होणारे सामने महत्त्वाचे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.