Home /News /sport /

मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच भारतीय टीममध्ये निवड

मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच भारतीय टीममध्ये निवड

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आता अवघे काही तास उरलेले असतानाच भारतीय टीममध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. वरुण चक्रवर्तीऐवजी टी. नटराजन (T. Natrajan) याची टी-20 टीममध्ये निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आता अवघे काही तास उरलेले असतानाच भारतीय टीममध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. टी-20 टीममध्ये निवड झालेल्या वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy) ला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार आहे. वरुण चक्रवर्तीऐवजी टी. नटराजन (T. Natrajan) याची टी-20 टीममध्ये निवड झाली आहे. वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. टी. नटराजन याला दोनच दिवसांपूर्वी कन्यारन्त प्राप्त झालं आहे. नटराजन याची पत्नी पवित्रा नटराजन हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या पायगुणानंतर नटराजन याची भारतीय टीममध्ये निवड झाल्यामुळे त्याचा आनंद अजून द्विगुणीत झाला आहे. नटराजन याने या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हैदराबादकडून खेळताना नटराजन याने या मोसमात सर्वाधिक यॉर्कर बॉल टाकले. नटराजन याने या मोसमात 16 मॅचमध्ये 16 विकेट घेतल्या. हैदराबादसाठी राशिद खाननंतर सर्वाधिक विकेट घेणारा नटराजन दुसरा खेळाडू ठरला. टी. नटराजनसोबतच रोहित शर्मा याची टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे, तर संजू सॅमसन वनडेसाठी अतिरिक्त विकेट कीपर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. इशांत शर्माच्या दुखापतीवर बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार सुरू आहेत. फिट झाल्यानंतर इशांतची टेस्ट टीममध्ये निवड होणार आहे. तर ऋद्धीमान सहाच्या दुखापतीवर लक्ष ठेवलं जाणार आहे, त्यानंतरच त्याच्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये सहाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. सहा भारताच्या टेस्ट टीममध्ये विकेट कीपर आहे. तर विराट कोहली पहिली टेस्ट झाल्यानंतर भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून येणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या