मुंबई, 24 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) ‘ऑल इज वेल’ नसल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. भारताचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीच हा आरोप केला आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर टी. नटराजन (T. Natrajan) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांना विचारा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. त्यामुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील एक मोठा वाद येत्या काळात पुढे येण्याची शक्यता आहे.
सुनील गावसकरांनी ‘स्पोर्ट्सस्टार’ या इंग्रजी वेबसाईटसाठी लिहिलेल्या ताज्या कॉलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बीसीसीआयकडून मिळत असलेल्या विशेष वागणुकीकडं लक्ष वेधले आहे. एकाच ड्रेसिंग रुममधील दोन खेळाडूंना पितृत्वाची रजा (Paternity Leave) बाबत वेगळा नियम का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विराट कोहलीला या कारणासाठी दौरा सोडून जाण्याची परवानगी मिळते, पण आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान वडील झालेल्या टी. नटराजनला अजूनही मुलीचे तोंड पाहता आलेलं नाही, या विरोधाभासाकडं गावसकरांनी लक्ष वेधले आहे. ‘नटराजन टीममध्ये नवखा असल्यानं या विषयावर तोंड उघडू शकत नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे.
(हे वाचा-जय शहांनी काढली गांगुलीच्या संघाची 'विकेट', क्रिकेटच्या 'दादा'चा पराभव)
अश्विनवरही अन्याय!
भारताचा अनुभवी ऑफ स्पिन आर. अश्विनची टीममधील जागा सध्या निश्चित नाही. भारताचा आघाडीचा स्पिनर असूनही त्याला टीममधील जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. ‘अश्विनच्या बॉलिंगमध्ये काही कमी आहे म्हणून नाही तर तो त्याची मतं टीमच्या बैठकीत मांडतो, त्यामुळे त्याच्यावर ही वेळ ओढावली आहे. अश्विन वगळता अन्य खेळाडू प्रत्येक मुद्यावर फक्त माना हलवतात’, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
(हे वाचा-हुकलेली IPL आणि Pub मधल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुरेश रैनाला मोठा दिलासा)
प्रत्येक खेळाडूसाठी वेगळे नियम
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या टेस्टमध्ये अश्विन अपयशी ठरला असता तर त्याला ‘आराम’ मिळाला असता. इतर खेळाडूंना सातत्यानं फ्लॉप होऊनही वारंवार संधी मिळते, कारण इथं प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळे नियम आहेत, अशी टीका गावसकरांनी केली आहे.