कोलंबो, 16 मे : गेल्या काही वर्षांपासून मैदानातील कामगिरी खालावलेल्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये (Sri Lanka Cricket) भूकंप झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, सुरंगीा लकमल, दिमूथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल या प्रमुख खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या खेळाडूंच्या पगारात कपात केली आहे. त्यामुळे या खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.
भारतामध्ये 2023 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेवून वन-डे आणि टी20 साठी एक नवी आणि तरुण खेळाडूंची टीम तयार करणार असल्याचे संकेत श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये वरिष्ठ खेळाडूंना कमी संधी मिळणार असल्यानं बोर्डानं त्यांच्या पगारात कपात केली आहे.
श्रीलंकतील मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार अँजलो मॅथ्यूज याच्या पगारात 50 हजार अमेरिकन डॉलरची कपात करण्यात आली आहे. त्याला मागच्या वर्षी 1.30 लाख डॉलर पगार होता. यंदा त्याला 80 डॉलर पगाराची ऑफर देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन दिमूथ करुणारत्ने याचा पगार 30,000 डॉलर्सनं कमी करण्यात आला आहे. करुणारत्ने यानं यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध चांगला खेळ केला होता. बांगलादेश विरुद्ध त्यानं 3 इनिंगमध्ये 427 रन काढले होते. त्यामुळे त्याला मागच्या वर्षी इतका पगार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याला 70 हजार डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे. सुरंगा लकमल आणि दिनेश चंडीमलला 45 हजार डॉलर पगार देण्याचा निर्णय श्रीलंकन बोर्डानं घेतला आहे.
प्रीतीच्या शाहरुखचा वीरेंद्र सेहवाग झाला 'जबरा फॅन' म्हणाला...
'या' खेळाडूंचा होणार फायदा
श्रीलंकन क्रिकेट बोर्ड लवकरच वार्षिक करार केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर करणार आहे. यामध्ये निराशेन डिकवेला आणि धनंजय डी सिल्वा यांना सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना 1 लाख डॉलर पगार मिळेल, अशी माहिती आहे. मागच्या महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त पदार्पण केलेल्या पथूम निसांकाला 55 हजार डॉलर तर कसू रजिता याला 50 हजार डॉलर पगार मिळण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.