मुंबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टीममध्ये संधी मिळाली नाही. सूर्यकुमार (Suryakumar Yadav)ला टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली. या मुद्द्यावर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार यादवची वेळ लवकरच येईल, त्याच्या कामगिरीमुळेच मुंबईचा यंदाच्या आयपीएलमध्ये दबदबा राहिला, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
मागच्या तीन आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव खोऱ्याने रन काढत आहे, तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एवढे वेळा स्वत:ला सिद्ध करुनही त्याला भारतीय टीममध्ये जागा का मिळत नाही? असे अनेक प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. यावरुनच अनेक माजी क्रिकेटपटूंनीही निवड समितीवरही आक्षेप घेतले.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'सूर्यकुमार यादवसाठी चांगली वेळ येईल. सूर्यकुमारशिवाय संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी प्रभावित केलं,' असं वक्तव्य गांगुलीने केलं. दुसरीकडे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवने संयम ठेवावा, असा सल्ला दिला होता.
टाईम्स नाऊशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'युवा खेळाडूंनी संयम ठेवावा, असं आम्हाला वाटतं. जर तुमच्या टीममध्ये प्रतिभा असणारे खेळाडू असतील, तर तुम्हाला संयम ठेवावा लागतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचं सोनं करा. निराश होण्याऐवजी सकारात्मक विचार ठेवा. माझ्या कारकिर्दीतही संधी मिळण्यासाठी मला प्रतिक्षा करावी लालगी होती.'
2018 सालच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमारने 14 मॅचमध्ये 133 च्या स्ट्राईक रेटने 512 रन केले होते. तर मागच्या मोसमात त्याने 16 मॅचमध्ये 424 रन केले होते. यावर्षीही सूर्याने 400 पेक्षा जास्त रन केले आहेत.