पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी नियम मोडला, तरी न्यूझीलंडवरच भडकला शोएब अख्तर

पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी नियम मोडला, तरी न्यूझीलंडवरच भडकला शोएब अख्तर

पाकिस्तान टीमच्या न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) दौऱ्यात नवा वाद समोर आला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या धमकीवर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच भडकला आहे.

  • Share this:

ऑकलंड, 29 नोव्हेंबर : पाकिस्तान टीमच्या न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) दौऱ्यात नवा वाद समोर आला आहे. पाकिस्तानी टीमचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) आला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडमध्ये असलेल्या 7 पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचे एकूण 53 खेळाडू आणि अधिकारी गेले आहेत. सीरिज सुरू व्हायच्या आधी 14 दिवस पाकिस्तानी खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पण पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून हा नियम धाब्यावर बसवला जात आहे. पाकिस्तानी टीमने पुन्हा नियम मोडला तर दौरा रद्द करू असा इशारा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या या धमकीवर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) मात्र चांगलाच भडकला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुधरावं, असा उलटा सल्लाच शोएबने दिला आहे.

शोएबने दिली धमकी

'पाकिस्तानची टीम कोणतीही क्लब टीम नाही, हे मी न्यूझीलंड बोर्डला सांगू इच्छितो. ही पाकिस्तानची राष्ट्रीय टीम आहे. आम्हाला तुमची गरज नाही. आमचं क्रिकेट संपलेलं नाही. तुम्हाला प्रसारण अधिकाराचे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही आमचे ऋणी असलं पाहिजे, कारण कठीण कालावधीमध्ये आम्ही तुमच्या देशाच्या दौऱ्यावर आलो आहोत. तुम्ही पाकिस्तानबद्दल बोलत आहात, पण हा देश या ग्रहावरचा सगळ्यात महान देश आहे. अशाप्रकारची वक्तव्य करणं बंद करा, पुढच्या वेळी लक्षात ठेवा,' असं शोएब त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला आहे.

शोएब अख्तरने दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डवरही निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या काळात टीमला चार्टर विमानाने का पाठवलं नाही? असा सवाल शोएबने विचारला आहे. 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला डोकं नाही का? टीमला पहिले दुबईला पाठवण्यात आलं, त्यानंतर क्वालालंपूर आणि त्यानंतर ऑकलंड. पाकिस्तानने खेळाडूंना चार्टर विमानाने पाठवणं गरजेचं होतं,' असं वक्तव्य शोएब अख्तरने केलं आहे.

पाकिस्तानी क्रिकेट टीमला न्यूझीलंडने शेवटचा इशारा दिला आहे. न्यूझीलंड सरकारला पाकिस्तानी टीम राहत असलेल्या हॉटेलचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं आहे. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू हॉटेलमध्ये फिरत असल्याचं आणि एकमेकांशी बोलत असल्याचं दिसत आहे. याचसोबत खेळाडू एकमेकांसोबत जेवण करत आहेत. खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं असलं तरी त्यांच्याकडून नियम मोडले जात आहेत.

Published by: Shreyas
First published: November 29, 2020, 10:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading