...म्हणून शोएब अख्तरने केलं फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्काराचं आवाहन

...म्हणून शोएब अख्तरने केलं फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्काराचं आवाहन

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. मोहम्मद पैगंबरांच्या कार्टुनवरुन सुरु असलेल्या वादावरुन शोएब अख्तरने फ्रान्सचा निषेध केला आहे. सोबतच त्याने फ्रान्सचे राष्ट्रपती एमेनुअल मॅक्रोन यांच्यावरही टीका केली आहे. मोहम्मद पैगंबरांचं कार्टुन दाखवल्याप्रकरणी काहीच दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या करण्यात आली होती.

फ्रान्समधल्या एका शिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबरांचं कार्टुन दाखवलं होतं. यानंतर या शिक्षकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर फ्रान्सच्या पोलिसांनी मारेकऱ्याला कंठस्नान घातलं. फ्रान्सचे राष्ट्रपती एमेनुअल मॅक्रोन यांनी शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची हत्या म्हणजे इस्लामिक दहशतवाद (Islamic Terrorism) असल्याचं सांगितलं. इस्लाम आमचं भविष्य संपवण्याचा हेतू ठेवतो, पण यामध्ये त्यांना कधीही यश येणार नाही, असं मॅक्रोन म्हणाले.

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या या वक्तव्यानंतर मुस्लिम राष्ट्रांनी त्यांच्यावर टीका केली. कार्टुन बनवण्याचा आणि दाखवण्याच्या अधिकाराचं मी समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया मॅक्रोन यांनी दिली होती. या वादात आता शोएब अख्तर यानेही उडी मारली आहे.

'फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन म्हणतात, फ्रान्सच्या कार्टुन बनवण्याच्या अधिकाराला संपवलं जाऊ शकत नाही. सोबतच ते फ्रेन्च उत्पादनांवर बहिष्काराचं आवाहन मुस्लिम राष्ट्रांनी मागे घ्यावं असंही म्हणतात. जर तुम्हाला द्वेष करण्याचं स्वातंत्र्य असेल, तर आम्हालाही तुमचा द्वेष नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे,' असं शोएब अख्तर म्हणाला आहे.

शोएब अख्तरच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्काराचं आवाहन योग्य असल्याचं म्हणलं, तर काहींनी पाकिस्तानची फ्रान्सचं सामान विकत घेण्याची लायकीच नाही, पाकिस्तानकडे एवढं महाग सामान घ्यायचे पैसेच नाहीत, अशी टीकाही केली.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 9:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या