मुंबई, 23 जानेवारी : पालघरचा (Palghar) शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)) ब्रिस्बेन टेस्टनंतर संपूर्ण देशाचा हिरो झाला आहे. ब्रिस्बेन टेस्टपूर्वी भारताचे सर्व प्रमुख बॉलर जखमी झाले होते, त्यामुळे शार्दुलला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. या संधीचा त्यानं पूर्ण फायदा उठवला. शार्दुलनं बॅट आणि बॉल या दोन्ही आघाडीवर कमाल केली. पहिल्या डावात 6 आऊट 186 अशी भारताची नाजूक अवस्था झाली होती. त्यावेळी शार्दुलनं 67 रनची खेळी केली.
बॅटिंगप्रमाणे बॉलिंगमध्येही शार्दुल चमकला. त्यानं पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेन टेस्टमध्ये तब्बल 32 वर्षांनी ऑस्ट्रेलिया पराभूत झाली. भारतीय टीमनं तर पहिल्यादांच ब्रिस्बेन टेस्ट जिंकली आहे. या ऐतिहासिक विजयात शार्दूलचा वाटा मोठा आहे.
लोकल ट्रेन हे आव्हान
शार्दुलनं कोणत्याही मुंबईकराप्रमाणे पालघरहून मुंबईला येण्यासाठी आजवर अनेकदा लोकलनं प्रवास केला आहे. यापूर्वी भारतीय टीमकडून खेळल्यानंतरही घरी परतत असताना त्यानं लोकलनं प्रवास केला होता.
(हे वाचा-शाळेतल्या मैत्रिणीशी केलं लग्न,बॉलिवूड कथेप्रमाणे आहे अजिंक्य रहाणेची Love Story)
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सबद्दल त्याला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता. त्यावेळी 'फास्ट बॉलर्सच्या समोर बॅटिंग करण्यापेक्षा लोकलमध्ये सीट मिळवणं हे अधिक अवघड आहे. त्यासाठी जास्त चांगल्या टायमिंगची आवश्यकता असते,'असं शार्दुलनं सांगितलं.
शार्दुलनं हे सर्व मजेत सांगितलं असलं तरी ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या डावातील त्याची खेळी पाहून तो हे खरं बोलतोय, असं वाटत होतं. मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा त्यानं अगदी आत्मविश्वासानं सामना केला होता. त्यानं त्या मॅचमध्ये पॅट कमिन्सला सिक्स मारुनच खातं उघडलं होतं.
‘शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं कष्टाची सवय!’
शार्दुलला मोठ्या कालावधीनंतर भारतीय टेस्ट टीममध्ये संधी मिळाली. त्यावर, 'कष्ट करणं हाच एकमेव पर्याय माझ्या हातामध्ये होता. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आयुष्यभर कष्ट करण्याची शिकवण मला मिळाली आहे. एक वर्ष पीक खराब आलं म्हणून आम्ही पुढच्या वर्षी शेती करणं सोडत नाही. क्रिकेटचं देखील तसंच आहे,' असं शार्दुलनं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.