Home /News /sport /

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार, फक्त एकच फॉरमॅट खेळणार

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार, फक्त एकच फॉरमॅट खेळणार

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे.

    मुंबई, 9 नोव्हेंबर : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मासोबत चर्चा केल्यानंतर त्याला पूर्ण फिट होण्यासाठी वनडे आणि टी-20 सीरिजसाठी आराम देण्यात आला आहे. रोहित शर्माला आयपीएल (IPL 2020)मध्ये पंजाब (KXIP)विरुद्धच्या सामन्यात मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. यानंतर टीम इंडियाचे फिजियो नितीन पटेल यांनी रोहित फिट नसल्याचं सांगितलं, पण यानंतर रोहित नेटमध्ये सराव करतानाही दिसला, तसंच 4 मॅचमध्ये विश्रांती घेतल्यानंतर तो मुंबई (Mumbai Indians)कडून मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला, त्यामुळे बराच वाद निर्माण झाला. रोहित आयपीएल खेळण्यासाठी फिट आहे, पण टीम इंडियाकडून खेळण्यासाठी फिट नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. दुसरीकडे आयपीएल मॅचदरम्यान टॉसवेळी रोहितने आपण फिट असल्याचं सांगितल्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता. या सगळ्या वादावर अखेर बीसीसीआयने पडदा टाकला आहे. रोहितसोबतच बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये आणखी काही बदल केले आहेत. विराट कोहली ऍडलेडमध्ये होणारी डे-नाईट टेस्ट मॅच संपल्यानंतर भारतात परत येणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून येणार आहे. याचसोबत निवड समितीने संजू सॅमसनला अतिरिक्त विकेट कीपर म्हणून वनडेमध्ये समाविष्ट केलं आहे. इशांत शर्मा हा सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेत आहे, तो फिट झाल्यानंतर त्याची टेस्ट टीममध्ये निवड होणार आहे. तर वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो टी-20 सीरिज खेळू शकणार नाही. वरुण चक्रवर्तीच्याऐवजी टी नटराजन याला टी-20 टीममध्ये संधी देण्यात आली आहे. ऋद्धीमान सहा यालाही आयपीएलदरम्यान मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली, पण त्याच्या दुखापतीबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ऋद्धीमान सहा टेस्ट टीममध्ये आहे. तर टीम इंडियासोबत नेट बॉलर म्हणून जाणारा कमलेश नागरकोटीदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टेस्ट टीमचं उरलेल्या तीन मॅचमध्ये नेतृत्व करेल. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली होती. मागच्यावेळी ऍ़डलेडमध्ये भारताचा विजय झाला होता, तर पर्थमध्ये भारताचा पराभव झाला यानंतर जोरदार पुनरागमन करत भारताने मेलबर्न टेस्ट जिंकली होती आणि पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज विजय मिळवला होता. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात पहिले 3 वनडे, 3 टी-20 आणि मग 4 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम 27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरला वनडे मॅच खेळेल. यानंतर 4 डिसेंबर, 6 डिसेंबर आणि 8 डिसेंबरला टी-20 मॅच होतील. 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची ही सीरिज संपल्यानंतर 4 टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर सीरिजला सुरुवात होईल. या सीरिजची पहिली टेस्ट 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये होईल. ऍडलेडमध्ये होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल. यानंतर 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरी, 7 जानेवारी ते 11 जानेवारीदरम्यान सिडनीमध्ये तिसरी आणि 15 जानेवारी ते 19 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथी टेस्ट होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या