मुंबई, 13 डिसेंबर : भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी 13 डिसेंबर खूप स्पेशल आहे. 13 डिसेंबरलाच रोहितने रितीका सजदेह (Ritika Sajdeh) सोबत 5 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. 13 डिसेंबर याच दिवशी रोहितने वनडे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतकही झळकावलं होतं. 2015 साली रोहितने रितीकासोबत लग्न केलं होतं. तर 2017 साली मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध रोहितने वनडे कारकिर्दीमधलं आपलं तिसरं द्विशतक केलं होतं.
25 बॉलमध्ये केले 124 रन
2017 साली श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये झालेल्या वनडेमध्ये रोहितने हा विक्रम केला होता. त्या मॅचमध्ये रोहितने नाबाद 208 रनची खेळी केली होती. रोहितच्या या द्विशतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 392 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 251-8 एवढाच स्कोअर करण्यात आला होता, त्यामुळे भारताचा 141 रनने विजय झाला.
रोहितने या मॅचमझ्ये 153 बॉलमधेच नाबाद 208 रन केले. आपल्या या खेळीमध्ये त्याने 124 रन फक्त 25 बॉलमध्येच केले होते. रोहितने या इनिंगमध्ये 13 फोर आणि 12 सिक्स लगावले होते.
याआधी 2014 साली रोहितने श्रीलंकेविरुद्धच वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर बनवण्याचा विश्वविक्रम केला होता. रोहितने त्या मॅचमध्ये 264 रन केले होते. तर 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये 209 रनची खेळी करत रोहितने पहिलं द्विशतक झळकावलं होतं.
6 वर्ष रिलेशनशीपमध्ये
रोहित आणि रितीका 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते, यानंतर 13 डिसेंबर 2015 साली त्यांनी लग्न केलं. रोहितने रितीकाला वेगळ्याच पद्धतीने प्रपोज केलं होतं. रोहितने वयाच्या 11 व्या वर्षी जिकडे पहिल्यांदा हातात बॅट पकडली होती, तिकडे बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहितने रितीकाला प्रपोज केलं होतं.