मुंबई, 13 सप्टेंबर: भारतीय क्रिकेट विश्वातील मोठी बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टनसी सोडण्याची शक्यता आहे. विराट वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी सोडेल. त्याच्या जागी रोहित शर्माकडं या टीमचं नेतृत्त्व दिले जाऊ शकते. विराट बॅटींगवर अधिक पोकस करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतो.
विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे, असं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिलं आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात यूएई आणि ओमानमध्ये टी20 वर्ल्ड कप होणार आहे.
T20 World Cup: टीम निवडीवर विराटची नाही तर रोहितची छाप, 'या' 3 निवडीमुळे झालं स्पष्ट
या विषयावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विराट कोहली स्वत: हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन होण्यासाठी विराटला पुन्हा एकदा त्याच्या बॅटींगवर अधिक फोकस करण्याची इच्छा आहे.’ रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं पाचवेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. दुसरिकडे विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला आजवर एकाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळालेले नाही. तसंच आयपीएल स्पर्धाही विराटला आजवर जिंकता आलेली नाही.
तीन वर्षांमध्ये 3 वर्ल्ड कप
आगामी काळात आयसीसीच्या 3 वर्ल्ड कप स्पर्धा सलग तीन वर्ष होणार आहेत. पुढील महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये टी वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात एक टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) होईल. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धांसाठी टीमची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा यासाठी त्याला लवकरात लवकर कॅप्टन करण्याची तयारी सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.