मुंबई, 5 मे : कल्याणच्या प्रणव धनावडे (Pranav Dhanawade) याने पाच वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वात धमाका केला होता. त्याने 2016 साली 15 व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये खेळताना एका इनिंगमध्ये 1009 रनची विशाल खेळी केली होती. प्रणवनं फक्त 323 बॉलमध्ये 59 सिक्स आणि 127 फोरच्या मदतीनं ही खेळी केली होती. हा क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमधील सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर आहे. प्रणवच्या या खेळीनं महान बॅट्समन सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील प्रभावित झाला होता. सचिनने प्रणवला घरी बोलावले होते.
प्रणवने 'क्रिकेटकंट्री' सोबत बोलताना त्या खेळीनंतर बदललेल्या परिस्थितीची आठवण सांगितली आहे. " तो रेकॉर्ड केल्यानंत माझ्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये भर पडली होती. मी बॅटींगला गेल्यावर दबावात असे. या दबावाखाली मी अनेकदा खराब शॉट खेळून आऊट झालो आहे. या खेळीनंतर सचिन तेंडुलकरनं मला घरी बोलावलं होतं. मास्टर ब्लास्टरनी त्याची बॅट मला भेट दिली." असे प्रणवनं सांगितले.
सचिननंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शालेय क्रिकेटमध्ये भरपूर रन काढले होते. त्याने शालेय क्रिकेटमध्ये नाबाद 329 रनची खेळी केली होती. सचिननं त्याचा शालेय मित्र आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सोबत 664 रनची पार्टरनरशिप केली होती. जो एक रेकॉर्ड आहे. प्रणवने सचिनबद्दल बोलताना सांगितले की, "मी अर्जुन तेंडुलकरचा मित्र आहे. त्या खेळीनंतर सचिननं मला घरी बोलावले होते. तो प्रसंग माझ्यासाठी स्वप्नवत होता. त्यांनी (सचिन तेंडुलकर) मला शुभेच्छा दिल्या. तसेच एक बॅट भेट दिली."
16 वर्षाच्या खेळाडूनं रचला इतिहास, 131 वर्षांमध्ये पहिल्यांदाच झाला विश्वविक्रम
कल्याणमधील ऑटो चालकाचा मुलगा असलेल्या प्रणव धनावडे याने केसी गांधी इंग्लिश स्कुल, कल्याणकडून खेळताना ही ऐतिहासिक इनिंग केली होती. त्याने इंग्लंडच्या एईडे कॉलिन्स याचा 117 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला होता. या रेकॉर्डनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) प्रणवला पाच वर्षांसाठी वार्षिक 10,000 रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. प्रणवला एअर इंडियाकडूनही स्कॉलरशिप मिळाली होती. या खेळीनंतर प्रणवला पुन्हा मोठी खेळी करता आलेली नाही. त्याला आजही सीनियर टीमकडून खेळण्याची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Kalyan, Mumbai, Sachin tendulkar