'...म्हणून ते मुर्खासारखं बडबडतात', सौरव गांगुली संतापला

'...म्हणून ते मुर्खासारखं बडबडतात', सौरव गांगुली संतापला

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. पण सुरुवातीला टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या दुखपतींमुळे टीममध्ये बदल करावे लागले. यानंतर बीसीसीआय (BCCI) वर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, यावर आता सौरव गांगुली (Sourav Ganguly) ने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

कोलकाता, 13 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. पण सुरुवातीला टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या दुखपतींमुळे टीममध्ये बदल करावे लागले. आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात कोलकाता (KKR)कडून खेळताना वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)ने उत्तम कामगिरी केली, त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली. पण खांद्याला दुखापत झाल्यामुळे वरुण चक्रवर्तीऐवजी टी. नटराजन याला टी-20साठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी घेण्यात आला.

रोहित शर्माला झालेल्या दुखापतीवरुनही बराच वाद निर्माण झाला, अखेर टेस्ट टीमसाठी रोहितची निवड करण्यात आली. तर विकेट कीपर ऋद्धीमान सहा याचीही टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली, पण आयपीएलमध्ये हैदराबाद (SRH)कडून खेळताना सहाच्या मांड्यांना दुखापत झाली, त्यामुळे तो शेवटच्या दोन मॅच खेळू शकला नाही. दुखापत झाली असली तरी सहा सध्या तरी भारताच्या टेस्ट टीममध्ये आहे. सहाच्या दुखापतीबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.

टीमच्या खेळाडूंना होत असलेल्या या दुखापतींमुळे बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या टीकेला आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांना दुखापतींबाबत फार माहिती नसते, म्हणून ते मुर्खासारखं बोलतात, अशी प्रतिक्रिया दादाने दिली आहे.

'खेळाडूंच्या दुखापतीबाबत कोणाला माहिती पाहिजे? आम्हाला माहिती आहे, टीमच्या फिजियोला माहिती आहे, एनसीएला माहिती आहे. लोकांना बीसीसीआय कसं चालतं ते माहिती नाही. बीसीसीआयचे ट्रेनर, फिजियो आणि ऋद्धीमान सहा यालाल त्याच्या दुखापतीबद्दल माहिती आहे. लोकांना दुखापतीबाबत काहीही कळत नाही, म्हणून ते मुर्खासारखं बडबडत असतात,' असं गांगुली म्हणाला.

'ऋद्धीमान सहा टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, कारण तो तेव्हापर्यंत फिट होईल. वनडे आणि टी-20 टीममध्ये तो तसाही नाही. संपूर्ण आयपीएलदरम्यान टीम इंडियाचे फिजियो आणि ट्रेनर दुबईमध्ये होते. या दुखापतींवर नितीन पटेल लक्ष ठेवून आहेत,' असं वक्तव्य गांगुलीने केलं. गांगुलीने द वीकला ही प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 13, 2020, 9:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या