Home /News /sport /

निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा मोहम्मद आमिर पुण्याकडून खेळणार!

निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा मोहम्मद आमिर पुण्याकडून खेळणार!

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता तो पुण्याच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. फक्त 28 व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या आमिरने टेस्टमध्ये 119 विकेट, वनडेमध्ये 81 विकेट आणि टी-20 मध्ये 59 विकेट घेतल्या. आमिरने पाकिस्तानसाठी 36 टेस्ट, 61 वनडे आणि 50 टी-20 मॅच खेळल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आमिरने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि टीम प्रशासनावर गंभीर आरोप केले. टीम प्रशासनाच्या मानसिक छळाला कंटाळून आपण निवृत्ती घेत असल्याचं मोहम्मद आमिर म्हणाला. निवृत्ती घेतल्यानंतर आता मोहम्मद आमिर अबु धाबी टी-10 लीगमध्ये खेळणार आहे. भारतीय फ्रॅन्चायजी पुणे डेव्हिल्सकडून आमिर मैदानात उतरेल. 28 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अबु धाबी टी-10 लीगमध्ये पुणे डेव्हिल्सचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. या टीमचा प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स असेल. मोहम्मद आमिरसोबत थिसारा परेरादेखील पुण्याच्या टीमकडून खेळेल. मोहम्मद आमिर याची पाकिस्तानी टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही. आमिरला संधी का देण्यात आली नाही, याबाबतही काही स्पष्ट सांगण्यात आलं नाही. आमिर मागच्या एका वर्षापासून टीम प्रशासनावर नाराज होता. जुलै 2019 साली मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी मोहम्मद आमिरने बॉलिंग प्रशिक्षक वकार युनूसवर धोकेबाज असल्याचा आरोप केला होता. टेस्टमधून निवृत्ती घेतल्यापासूनच आमिर टीमच्या निशाण्यावर होता आणि आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या