ऑकलंड, 5 डिसेंबर : पाकिस्तानी टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यातला वाद (New Zealand vs Pakistan) काही कमी व्हायचं नाव घेत नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) नाराज झाल्यामुळे ते आपल्या खेळाडूंना न्यूझीलंडवरून परत बोलावण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये याबाबतची वृत्त येत आहेत. पाकिस्तानची टीम न्यूझीलंडमध्ये 11 दिवसांपासून क्वारंटाईन आहे, पण अजूनही त्यांना सराव करायला परवानगी मिळालेली नाही. शुक्रवारी पाकिस्तानची टीम सरावासाठी बाहेर निघणार होती, पण न्यूझीलंड सरकारच्या आरोग्य विभागाने त्यांना सरावाची परवानगी दिली नाही. न्यूझीलंडच्या या वागणुकीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झालं आहे.
पाकिस्तानमधल्या जियो टीव्हीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पीसीबीने एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत टीमला न्यूझीलंडवरून परत बोलावण्याबाबत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी मुख्य प्रशिक्षक मिसहबाह उल हक आणि कर्णधार बाबर आजम यांच्याशी चर्चा केली. मणी यांनी या दोघांना दौरा सुरू ठेवायचा का परत यायचं? याबाबत विचारणा केली. मिसबाह टीमच्या इतर खेळाडूंशी बोलून बोर्डाला याबाबत माहिती देणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी सरावाला परवानगी न दिल्याबद्दल नाराजी जाहीर केली होती.
आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानचे खेळाडू कोरोना पसरवतील अशी भीती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाला आहे. मागच्या 11 दिवसांपासून पाकिस्तानची टीम हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेल्यानंतर पाकिस्तानचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले, यानंतरआणखी एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
न्यूझीलंडचा पाकिस्तानला इशारा
हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतानाही खेळाडू एकमेकांना भेटत होते आणि एकत्र जेवण करत होते, असं सीसीटीव्ही दृष्यांमध्ये दिसलं. पाकिस्तानी टीम कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत नसल्यामुळे त्यांना न्यूझीलंडने इशारा दिला होता. यापुढे एकही चूक केली तर टीमला पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल, अशी ताकीद न्यूझीलंडने दिली होती.
शोएब अख्तर भडकला
न्यूझीलंडने दिलेल्या या इशाऱ्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर चांगलाच भडकला होता. 'ही कोणती क्लब टीम नसून पाकिस्तानची राष्ट्रीय टीम आहे. आम्हाला तुमची गरज नाही. आमचं क्रिकेट संपलेलं नाही. तुम्हाला प्रसारण अधिकाराचे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही आमचे ऋणी असलं पाहिजे, कारण कठीण कालावधीमध्ये आम्ही तुमच्या देशाच्या दौऱ्यावर आलो आहोत, त्यामुळे पुढच्या वेळी सांभाळून बोला,' असं शोएब म्हणाला होता.