मुंबई, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) प्रमाणेच न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK ) यांच्यातही सध्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सुरु आहे. शुक्रवारी सुरु झालेल्या या टेस्टमध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून न्यूझीलंडला पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिले.
पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीनं ( Shaheeen Afridi) न्यूझीलंडच्या दोन्ही ओपनर्सना झटपट आऊट करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यानंतर केन विल्यमसन आणि रॉस टेलर ही न्यूझीलंडची अनुभवी जोडी जमली. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 120 रन्सची पार्टनरशिप केली. रॉस टेलर 70 वर आऊट झाल्यानं पाकिस्तानला तिसरं यश मिळाले.
रॉस टेलरनंतर हेन्री निकोलस ( Henry Nicholls) बॅटिंगला आला. निकोलस- टेलर जोडीनं पाकिस्तानच्या खेळाडूंची संयमाची परीक्षा पाहिली. यासिर शाह (Yasir Shah) निकोलसला आऊट करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होता. मात्र त्याला यश मिळत नव्हते. त्यामुळे यासिरच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
यासिरचा संयम संपला!
पहिल्या दिवसाच्या 77 व्या ओव्हरमध्ये यासिरनं टाकलेला बॉल निकोसनं कट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बॉल त्याच्या बॅटला लागला नाही. त्यामुळे विकेटकिपर मोहम्मद रिझवाननं बॉल पकडल्यानंतरही निकोलस वाचला. सतत प्रयत्न करुनही विकेट मिळत नसल्यानं यासिरचा संयम संपला आणि तो मैदानावरच ओरडला.
OUT hoja Bhootni kay Yasir larky pic.twitter.com/2JSUc8W9uw
— ... (@7Strang_er18) December 26, 2020
यासिरनं निकोलसला उद्देशून ‘आऊट हो जा भूतनी के’ असे शब्द वापरले. त्याच्या संतापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निकोलस आणि विल्यमसन जोडीनं पहिल्या दिवशी पाकिस्तानच्या बॉलर्सना दाद दिली नाही. न्यूझीलंडनं पहिल्या दिवसअखेर 3 आऊट 222 रन्स केले होते.
निकोलस दुसऱ्या दिवशी 56 रनवर आऊट झाला. त्याला नसीम शाहनं आऊट केले. केन विल्यमसनने त्याचा फॉर्म कायम ठेवत शतक झळकावले. विल्यमसन 129 रन काढून आऊट झाला.