अनिल कुंबळेचा वारसदार; 15व्या वर्षीच केली 'परफेक्ट 10'ची कामगिरी!

अनिल कुंबळेचा वारसदार; 15व्या वर्षीच केली 'परफेक्ट 10'ची कामगिरी!

भारताच्या एका गोलंदाजाने 'परफेक्ट 10'ची कामगिरी केली आहे.

  • Share this:

दिसपूर, 07 नोव्हेंबर: भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याने दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध 1999मध्ये ऐतिहासिक अशी गोलंदाजी करत दहाच्या दहा फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी कुंबळे केवळ दुसरा गोलंदाज ठरला होता. त्याआधी इंग्लंडच्या जिम लेकर (Jim Laker)याने 1956मध्ये अशी कामगिरी केली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती आता आणखी एका भारतीय गोलंदाजाने केली आहे.

क्रिकेटमध्ये एका डावात सर्वच्या सर्व 10 गडी बाद करण्याची कामगिरी अगदी कमी गोलंदाजांना करता आली आहे. बुधवारी भारताच्या एका गोलंदाजाने अशी विक्रमी कामगिरी केली आहे. आसाममधील तेजपूर येथे झालेल्या 16 वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफी ( U-16 Vijay Merchant Trophy match)स्पर्धेत नागालँड (Meghalaya vs Nagaland)विरुद्ध खेळताना मेघालयच्या निर्देश बैसोया (Nirdesh Baisoya)या फिरकीपटूने एका डावात 10च्या 10 फलंदाजांना बाद केले. निर्देशने 21 षटकात 51 धावा देत ही कामगिरी केली. त्याच्या या भेदक गोलंदाजीपुढे नागालँडचा संघ 113 धावात बाद झाला.

निर्देशचे 'परफेक्ट 10'

निर्देशने त्याची पहिली विकेट 10व्या षटकात घेतली. नागालँडचा ओपनर सावलिन कुमार हा निर्देशचा पहिला बळी ठरला. त्यानंतर निर्देशने एकापाठोपाठ एक फलंदाजांना बाद करत नागालँडचा संघ 113 धावांवर माघारी पाठवला. निर्देशच्या गोलंदाजीचे वैशिष्ट म्हणजे तो अनिल कुंबळे सारखीच गोलंदाजी करतो. निर्देशने या सामन्यात केवळ गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत देखील कमाल केली. या सामन्यात त्याने 100 चेंडूत 68 धावा केल्या. निर्देश मुळचा उत्तर प्रदेशमधील मेरठचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो मेघालयकडून गेस्ट प्लेअर म्हणून खेळत आहे.

तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता

अनिल कुंबळे यांनी जेव्हा 10 विकेट घेतल्या होत्या तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता, अशी प्रतिक्रिया निर्देशने दिली. कुंबळे यांच्या त्या कामगिरीबद्दल मी खुप काही ऐकले होते. तशी कामगिरी करण्याची माझी इच्छा होती पण करिअरच्या सुरुवातीलाच अशी कामगिरी होईल असे मला वाटले नव्हते. मी पहिल्या सत्रात 6 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. 'परफेक्ट 10'ची कामगिरी करण्यासाठी टीममधील सर्वांची साथ दिल्याचे तो म्हणाला.

First published: November 7, 2019, 1:39 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading