पाकिस्तानची न्यूझीलंडमधली विघ्न संपेना, खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर आता आणखी एक धक्का

पाकिस्तानची न्यूझीलंडमधली विघ्न संपेना, खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर आता आणखी एक धक्का

पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यातील (New Zealand vs Pakistan) विघ्न काही संपताना दिसत नाहीयेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे.

  • Share this:

ऑकलंड, 13 डिसेंबर : पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यातील (New Zealand vs Pakistan) विघ्न काही संपताना दिसत नाहीयेत. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानच्या 7 खेळाडूंना कोरोना (Corona Virus)ची लागण झाली होती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पाकिस्तानच्या टीमला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे. बाबरच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो टी-20 सीरिज खेळणार नाही. रविवारी पाकिस्तानची टीम क्वीन्सटाऊनमध्ये सराव करत होती, तेव्हा बाबरच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली.

बाबरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो कमीत कमी 12 दिवस खेळू शकणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. डॉक्टर बाबर आझमच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. तो पहिल्या टेस्टमध्ये खेळेल का नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. बाबरशिवाय शादाब खान यालाही मांडीची दुखापत झाली आहे, तर इमाम उल हक याचाही अंगठाच फ्रॅक्चर झाला आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला 18 डिसेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरूवात होणार आहे. यानंतर 20 डिसेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि 22 डिसेंबरला नेपियरमध्ये मॅच होईल. टी-20 सीरिज खेळायला मिळणार नसल्यामुळे बाबर दु:खी आहे, पण भविष्यात खूप क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळे तो लवकर फिट होईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकने दिली.

न्यूझीलंड दौरा वादात

पाकिस्तानची टीम न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यापासूनच वादात सापडली आहे. न्यूझीलंडमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाच्या नियमांचं पालन करत नाहीत, त्यामुळे त्यांनी नियम पाळले नाहीत, तर त्यांना घरी पाठवण्यात येईल, असा सज्जड दम न्यूझीलंड सरकारने भरला होता. क्वारंटाईन कालावधीमध्ये पाकिस्तानचे खेळाडू हॉटेलमध्ये एकमेकांना भेटत होते, तसंच एकत्र जेवत असल्याची सीसीटीव्ही दृष्यं समोर आली होती, त्यामुळे पाकिस्तानी टीमला न्यूझीलंडने ताकीद दिली होती. दुसरीकडे पाकिस्तानी टीमला सरावालाही परवानगी मिळत नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी बोलून दाखवली होती.

शोएबची न्यूझीलंडवर टीका

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानेही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या वर्तणुकीवर टीका केली होती. पाकिस्तान क्लबची नाही तर एक आंतरराष्ट्रीय टीम आहे, त्यामुळे अशाप्रकारचे इशारे देणं टाळलं गेलं पाहिजे. कठीण परिस्थितीमध्येही पाकिस्तानी टीम न्यूझीलंडमध्ये खेळायला आली आहे, यामुळे तुम्हाला मॅचच्या प्रसारणातून पैसे मिळणार आहेत, असं शोएब अख्तर म्हणाला होता.

Published by: Shreyas
First published: December 13, 2020, 4:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या