नवी दिल्ली, 01 जून: गेलं दीड वर्षं कोरोनाने सर्व जगातील माणसांचं आयुष्य व्यापून टाकलंय. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली त्यामुळे लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या (Indian Premier League T-20 Cricket ) 14 व्या सीझनमधल्या 29 मॅचेस झाल्यानंतर ती स्पर्धा मध्येच स्थगित करावी लागली. ही स्पर्धा आता सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 दरम्यान खेळवली जाणार आहे. याच स्पर्धेप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वाच्या दृष्टिने महत्त्वाची आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. पण कोविडमुळे (Covid-19) कदाचित या स्पर्धेचं स्थान बदलावं लागले.
या सर्व पार्श्वभूमीवर आज (1 जून 21) आयसीसीची मीटिंग होणार आहे. या बैठकीला बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे उपस्थित राहू शकतात. टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup Cricket) स्पर्धेचं यजमानपद भारताकडेच रहावं यासाठी या दोघांना या बैठकीत बाजू मांडावी लागणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वांत पहिल्यांदा भारत आणि दुसरा पर्याय म्हणून यूएईचा विचार केला जावा अशी बीसीसीआयची भूमिका आहे. आयसीसीच्या आज होणाऱ्या मीटिंगमध्ये टी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी मुदत वाढवून देण्याची मागणीही बीसीसीआय करू शकतं असं सूत्रांनी सांगितलं आहे.
हे वाचा-VIDEO : इंग्लंडला जाण्याआधी क्वारंटाईन सेंटरमध्ये भारतीय खेळाडू करतायत हे काम
आयसीसीच्या (ICC) या मीटिंगमधील हे 4 महत्त्वाचे मुद्दे
1) टी-20 वर्ल्ड कपचं यजमानपद- आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा यंदा भारतात होणार होती. पण कोविडचा संसर्ग वाढल्यामुळे भारतात स्पर्धा खेळवता येऊ शकते का? असं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. या स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण म्हणून आयसीसीने यूएई ठरवलं आहे. यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यासाठी कदाचित बीसीसीआय (BCCI) आजच्या आयसीसीच्या बैठकीत आणखी एक महिन्याचा वेळ मागून घेऊ शकतं.
2) टॅक्समध्ये सूट – भारतात स्पर्धा झाल्यास टॅक्समध्ये सूट मिळावी यासाठी 2016 पासून बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये चर्चा सुरू आहे. बीसीसीआय याबाबत भारत सरकारशी बोलणी करत आहे पण जर सरकारने सूट दिली नाही तर आयसीसीला 905 कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागेल.
हे वाचा-IPL 2021 : आयपीएलला धक्का, इंग्लंडनंतर आता आणखी एका देशाचे खेळाडू खेळणार नाहीत
3) पुढच्या दौऱ्यांबाबत चर्चा – आयसीसीच्या या मीटिंगमध्ये 2023 ते 2031 या काळातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यांबद्दल चर्चा होणार असून वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील टीमची संख्या 10 वरून 14 करण्याबाबतचा निर्णयही होऊ शकतो.
4) पाकिस्तानी टीमचा भारत दौरा- भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांनी 2012-13 पासून परस्परांविरुद्ध त्या देशांत जाऊन सामने खेळेलेले नाहीत. त्यामुळे जर टी-20 वर्ल्ड कप भारतात झाला तर पाकिस्तानी संघाला सामना खेळण्यासाठी भारतात येऊ देण्यासंबंधीही या मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेत खेळण्यासाठी भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानी खेळाडूंना येण्याची परवानगी दिली जाऊ शकते कारण 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Cricket news, T20 world cup