अंपायर्स कॉल ते लाळ, क्रिकेटच्या नियमांमध्ये पुन्हा बदल होणार!

अंपायर्स कॉल ते लाळ, क्रिकेटच्या नियमांमध्ये पुन्हा बदल होणार!

क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरलिबोर्न क्रिकेट क्लब (MCC) डीआरएस (DRS)चा अंपायर्स कॉल, बॉलवर लाळ वापरण्यावर कायमची बंदी यासोबतच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत विचार करत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरलिबोर्न क्रिकेट क्लब (MCC) डीआरएस (DRS)चा अंपायर्स कॉल, बॉलवर लाळ वापरण्यावर कायमची बंदी यासोबतच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत विचार करत आहे. याबाबत एमसीसीच्या क्रिकेट कमिटीची सोमवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत अनेक सदस्यांनी अंपायर्स कॉल खूप गोंधळ घालणारा आहे, तसंच चाहत्यांनाही हे समजत नाही, अशा तक्रारी केल्या. तर काही सदस्यांनी याचं कौतुकही केलं. आता हा प्रस्ताव चर्चा करण्यासाठी आयसीसी (ICC) च्या क्रिकेट कमिटीकडे पाठवण्यात आला आहे.

डीआरएसच्या अंपायर्स कॉलवरून भारत-इंग्लंड टेस्टनंतर (India vs England) वाद वाढला. दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) च्या बॉलिंगवर जो रूट (Joe Root) विरुद्ध विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) ने कॅचसाठी अपील केलं. पण अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) यांनी हे अपील नाकारलं. यानंतर पंतने कोहलीला (Virat Kohli) डीआरएस घ्यायला लावला. रिप्लेमध्ये बॉल बॅटला लागला नसल्याचं दिसलं, त्यामुळे कॅचच्या अपीलपासून रूट वाचला. पण बॉल ट्रॅकिंगमध्ये अक्षर पटेलचा बॉल रूटच्या पॅडला लागल्याचं दिसत होतं, त्यामुळे एलबीडब्ल्यूमध्ये रूट अडकत होता. पण अंपायर्स कॉलमुळे भारताला रूटची विकेट मिळाली नाही. तेव्हापासून या वादाला सुरूवात झाली.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली (Sourav Ganguly), कुमार संगकारा (Kumar Sangakara) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांच्यासारख्या दिग्गजांच्या एमसीसी कमिटीमध्ये अंपायर्स कॉलच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली. यातल्या काही सदस्यांनी अंपायर्स कॉलऐवजी आऊट किंवा नॉट आऊट यापैकी एकच निर्णय द्यावा, अशी मागणी केली. तसंच स्टम्प्सला बॉल कमीत कमी 50 टक्के लागत असेल, तर त्याबाबतच्या निर्णयाबाबत सगळ्यांमध्ये एकमत झालं.

याशिवाय बॉलवर लाळ वापरण्यावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही क्रिकेट कमिटीने केली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे बॉलवर लाळ लावायला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कायमची बंदी घालण्याआधी खेळाडूंचं मतही घेतलं जाणार आहे.

दुसरीकडे शंकास्पद कॅचबाबतही एमसीसीच्या बैठकीत चर्चा झाली. 30 यार्ड्या आतमध्ये संशयास्पद कॅच पकडला असेल तर अंपायरची सॉफ्ट सिग्नलची पद्धत योग्य आहे, पण बाऊंड्री लाईनवर असा कॅच पकडला असेल, तर अंपायरला दिसत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सॉफ्ट सिग्नलऐवजी अंपायरने बॉल दिसला नसल्याचं सांगाव, यासाठी वेगळ्या सिग्नलचा वापर केला जाऊ शकतो, असं मत एमसीसीच्या बैठकीत मांडण्यात आलं.

Published by: Shreyas
First published: February 23, 2021, 5:25 PM IST

ताज्या बातम्या