India vs Bangladesh : ऐतिहासिक सामन्याचा फर्स्ट डे फस्ट शो विराट-इशांतच्या नावावर, बांगलादेशवर आघाडी!

India vs Bangladesh : ऐतिहासिक सामन्याचा फर्स्ट डे फस्ट शो विराट-इशांतच्या नावावर, बांगलादेशवर आघाडी!

दोन्ही संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र सामना खेळत असल्यानं दोन्ही संघासाठी ही खरी कसोटी असणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात आज ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या दिवसा अखेर भारताने 3 गडी बाद 174 धावा केल्या आहे. विराट कोहली 59 तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत आहे. आजचा दिवस हा इशांत शर्माच्या नावावर जमा झाला. कारण, इशांतने भारतामध्ये 12 वर्षांनंतर एका सामन्यात 5 गडी बाद केले.

इडन गार्डनच्या मैदानात भारतीय क्रिकेटमधल्या गुलाबी पर्वाला सुरुवात झाली. आजच्या या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतानं दादागिरी करत अधिराज्य गाजवलं. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संपूर्ण संघाला केवळ 106 धावांमध्ये गुंडाळले. यात इशांत शर्मानं 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान, या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांचा चांगली सुरुवात करता आली नाही. भारताचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. मयंक अग्रवाल 14 तर रोहित शर्मा 21 धावा करत बाद झाला.  दरम्यान, सलामीचे फलंदाज माघारी गेल्यानंतर पूजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताला आघाडी मिळवून दिली. पुजारा आणि कोहली यांच्यात 94 धावांची भागिदारी झाली. 39व्या ओव्हरमध्ये पूजारा 55 धावा करत बाद झाला. भारताच्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात पहिली अर्धशतकी खेळी करण्याची कामगिरी पुजारानं केली आहे. मात्र, इबादत हुसैननं पुजाराला माघारी धाडले.

विराटनं कसोटीमध्ये पूर्ण केल्या 5000 धावा

बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात विराटनं 32 धावा करताच 5000 धावा पूर्ण केल्या. विराटनं कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावा केल्या. विराटनं ही कामगिरी 86व्या डावांत केली. याचबरोबर विराटनं रिकी पॉंटिंगला मागे टाकले आहे. पॉटिंगने 97 डावांमध्ये अशी कामगिरी केली होती. तर, क्वाईव लॉयड यांनी 106 डावांमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या.

पिंक बॉलमध्ये षटकार खेचणारा रोहित पहिला फलंदाज

रोहित शर्मानं कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या डावात पाचव्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. रोहित 21 धावा करत बाद झाला असता तरी, त्यानं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितनं पहिल्या ओव्हरमध्ये अल-अमीनच्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळं भारताकडून पहिला षटकार लगावणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे.

बांगलादेशची पहिली इनिंग

तत्पूर्वी बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. 15 ओव्हरच्या आतच बांगलादेशचा जवळ जवळ निम्मा संघ माघारी परतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांची अडखळत सुरुवात झाली. इशांत शर्मानं इम्रूल कायेसला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते रोहित शर्मानं. 10व्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या हातात चेंडू सोपवल्यानंतर त्यानं बांगलादेशच्या फलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्याच चेंडूवर कर्णधार मोमिनूल हकला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. चहापानापर्यंत बांगलादेशला फक्त 73 धावा करता आल्या. यात त्यांनी 6 विकेट गमावल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामनं 29 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. तीन फलंदाज चक्क शुन्यावर बाद झाले यात बांगलादेशच्या कर्णधाराचाही समावेश होता.

डे-नाइट सामन्याचे नियम

पारंपारिक सामन्यापेक्षा या सामन्याचे नियम वेगळे असणार आहेत. पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

असा आहे डे-नाइटचा इतिहास

आतापर्यंत 11 वेळा दिवस-रात्र सामना झाला आहे. मात्र भारतासाठी ही पहिली वेळ असणार आहे. असे असले तरी, डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया होय. ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक डे-नाईट सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांची कामगिरी देखील शानदार आहे. क्रिकेटमधील पहिला डे-नाईट कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने विजय मिळवला होता. डे-नाईटमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा देखील पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ वेस्ट इंडिने 3 डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. पण या तिन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला. इंग्लंडने डे-नाईट कसोटीमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी ऑगस्ट 2017मध्ये वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 209 धावांनी पराभव केला होता.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव.

बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), मेहिदी हसन, नयीम हसन, अल-अमिन हुसैन, ईबादत हुसैन, मोसादीक हुसैन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, इम्रूल कायेस, महमुदुल्ला, मोहम्मद मिथुन, मुशफिकूर रहिम, मुस्ताफिझूर रहमान.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या