India vs Australia: चहलच्या सिक्सरनंतर धोनीचा धमाका, भारताचा वनडे मालिकेतही ऐतिहासिक विजय

मालिकावीर म्हणून महेंद्रसिंग धोनीला गौरविण्यात आले. केदार जाधवने ५० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2019 04:59 PM IST

India vs Australia: चहलच्या सिक्सरनंतर धोनीचा धमाका, भारताचा वनडे मालिकेतही ऐतिहासिक विजय

मेलबर्न, 18 जानेवारी : केदार जाधवने ५० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताने २३१ धावांचं लक्ष्य ४९.२ षटकांमध्येच पूर्ण केलं. यावेळी भारताने फक्त तीन गडी गमावले. भारतासाठी महेंद्रसिंग धोनीने ८७ (११४), केदार जाधव ६१ (५७), कर्णधार विराट कोहलीने ४६ (६२) या खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या. तर जे रिचर्डसन, पीटर सिडल आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर भारतासाठी युजवेंद्र चहलने ६ भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

धोनीने ७४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सध्या मैदानात धोनी... धोनी... या नावाचाच गजर होत आहे. हे धोनीचं मालिकेतलं सलग तीसरं अर्धशतक आहे तर करिअरमधलं ७० वं अर्धशतक आहे. जे रिचर्डसनने ३० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. कोहलीने ६२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. यष्टीरक्षक एलेक्स कॅरीने त्याचा झेल पकडला.

भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. रोहित शर्मा ५ धावा करत पीटर सिडलकरवी आणि शिखर धवनला २३ धावांवर  बिली स्टानलेकने बाद केले. चौथ्या विकेटसाठी महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला.

मोहम्मद शमीने त्याच्या शेवटच्या १० व्या षटकात आणि सामन्याच्या ४८.४ षटकावेळी बिली स्टानलेकला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑल-आऊट केले. ऑस्ट्रेलियाने ४८.४ षटकांत २३० धावा केल्या. आता भारताला हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी ५० षटकांत २३१ धावा करण्याची गरज आहे.

या सामन्याचा घरा मानकरी ठरला तो युझवेंद्र चहल. चहलने अवघ्या ४२ धावा देत ६ गडी बाद केले. पीटर हँड्सकॉम्बने ६३ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. पंचांनी त्याला बाद घोषीत केले असताना पीटरने रिव्ह्यू मागितला. पण त्याचा फायदा झाला नाही. पीटरला बाद करुन चहलने पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला.

Loading...

भारताच्या फिरकी गोलंदाजी पुढे कांगारुंच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. एलेक्स कॅरी आणि एरॉन फिंच या सलामीच्या जोडीला भुवनेश्वर कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. तर युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाला बाद करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा पाचव्या गडीलाही चहलनेच बाद केले. चहलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्टोइनिसचा झेल पकडत त्याला बाद केले.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. मोहम्मद सिराजऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर रायडूच्या जागी केदार जाधवला आणि कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला यावेळी विश्रांती देण्यात आली.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ १-१ बरोबरीत आहेत. ऑस्ट्रेलियाने सिडनीमधअये पहिला सामना ३४ धावांनी जिंकला. तर एडिलेडमध्ये भारताने सहा गडी राखून सामना जिंकला. आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ स्वरुपातला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवापासून वाचण्यासाठी सर्व काही करेल. तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल.

भारताने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर आतापर्यंत द्विपक्षीय एकदिवसीय मालिका एकदाही जिंकलेली नाही. या प्रकारात भारताने १९८५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २००८ मध्ये सीबी सीरीज आपल्या नावावर केली होती. मेलबर्न भारताला विजय मिळाला तर या संपूर्ण दौऱ्यात एकही मालिका न गमावण्याचा विक्रमही टीम इंडिया करेल.

ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या संघात दोन बदल केले. बिली स्टानलेक आणि एडम झांपा यांना संघात स्थान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न मैदानात भारताविरुद्ध १४ सामने खेळले असून यात भारताने पाच सामने जिंकले आहेत. २००८ मध्ये भारताने या मैदानात शेवटचा सामना जिंकला होता.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंग धोनी, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, विजय शंकर आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ: एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कैरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, पीटर सिडल, जे रिचर्डसन, बिली स्टानलेक, आणि एडम झांपा.


VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 07:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...