मुंबई, 28 जानेवारी : संपूर्ण देशानं 2 दिवसापूर्वी प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला. या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही मान्यवरांना खास पत्र पाठवलं होतं. हे सर्व मान्यवर विदेशी असले तरी त्यांना भारताबद्दल आस्था आहे. या मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मोदींनी अनेकांना पत्र लिहिले होते. यामध्ये ख्रिस गेल, जॉन्टी ऱ्होडस या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनला (Kevin Pietersen) देखील मोदींनी खास पत्र पाठवले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पत्र पीटरसननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये त्याला उत्तर देत मोदींचे आभार व्यक्त केले आहेत. पीटरसन लिहितो, 'आदरणीय मोदीजी, मला लिहिलेल्या पत्रात तुम्ही ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केली आहे, त्यासाठी धन्यवाद. 2003 साली पहिल्यांदा भारतामध्ये आलो होतो. त्यानंतर प्रत्येक वेळी माझी या देशाबद्दलची आपुलकी वाढली आहे. भारतामधील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी आभारी आहे. मला तुमची वैयक्तिक भेट घेण्याची खूप उत्सुकता आहे.'
मोदींच्या पत्रात काय?
पीटरसननं मोदींचं पत्र देखील शेअर केलं आहे. त्या पत्रात मोदींनी लिहिले आहे की, 'प्रिय श्रीयुत, केविन पीटरसन. भारत देशाकडून नमस्ते. 26 जानेवारी रोजी आम्ही दरवर्षी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. या दिवशी आमच्या घटना समितीनं मोठ्या विचारमंथनातून राज्यघटना लागू करण्याचा निर्णय घेतला. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतो. यावर्षीचा प्रजासत्ताक दिवस आणखी खास आहे. कारण, यावर्षी भारत देश स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करत आहे.
त्यानिमित्तानं मी तुम्हाला आणि भारताच्या अन्य मित्रांना तुमच्या भारताबद्दलच्या प्रेमासाठी पत्र लिहित आहे. तुम्ही आमचा देश आणि देशातील लोकांसाठी यापुढील काळात देखील काम कराल अशी मी आशा व्यक्त करतो.'
बेबी डीव्हिलियर्स होणार मेगा ऑक्शनमध्ये सहभागी, वाचा कोणत्या टीममध्ये खेळण्याचं आहे स्वप्न
हिंदी ट्विटचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पीटरसन हिंदीमधून करत असलेल्या ट्विटचा देखील उल्लेख केला. 'क्रिकेटच्या मैदानातील तुझे योगदान सर्वांनाच चांगले माहिती आहे. त्याचबरोबर भारत देश आणि येथील लोकांबद्दलची तुझी आस्था खूपच खास आहे, मला तुझे हिंदी ट्विट पाहून देखील आनंद वाटतो. मी पुन्हा एकदा तुला प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतो. तुझी भविष्यात भेट घेण्याची मी वाट पाहात आहे,' असे मोदी यांनी म्हंटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, PM narendra modi, Republic Day