Home /News /sport /

एन्जियोप्लास्टीनंतर कपिल देव गोल्फच्या मैदानात, VIDEO शेयर करत म्हणाले...

एन्जियोप्लास्टीनंतर कपिल देव गोल्फच्या मैदानात, VIDEO शेयर करत म्हणाले...

भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team)ला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे कपिल देव (Kapil Dev) शस्त्रक्रियेनंतर समोर आले आहेत.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team)ला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे कपिल देव (Kapil Dev) शस्त्रक्रियेनंतर समोर आले आहेत. एन्जियोप्लास्टीनंतर दोन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर कपिल देव गोल्फच्या मैदानात दिसले. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर कपिल देव हौस म्हणून गोल्फ खेळतात. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा गोल्फ खेळण्याची इच्छा असल्याचं 61 वर्षांच्या कपिल देव यांनी याआधीच बोलून दाखवलं होतं. यानंतर आता गुरुवारी दिल्लीच्या गोल्फ क्लबमध्ये त्यांना खेळताना पाहण्यात आलं. दिल्लीच्या सुंदर नगर भागात राहणाऱ्या कपिल देव यांना छातीत दुखत असल्यामुळे ओखलाच्या फोर्टिस एस्कोर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या इमर्जन्सी विभागात ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटलने सुरुवातीला कपिल देव यांना छातीत दुखत असल्याचं सांगितलं, पण यानंतर कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच एन्जियोप्लास्टी करण्यात आली. 1994 साली कपिल देव यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर हौस म्हणून ते गोल्फ खेळायला लागले. गोल्फच्या अनेक स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी ते हॉस्पिटलमधून घरी आले आणि चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. टीव्हीवर कपिल देव यांनी विश्लेषक म्हणून आपल्या कामालाही सुरुवात केली. कपिल देव यांनी गोल्फच्या मैदानातला एक व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला आहे. गोल्फ कोर्सवर परत आल्याचा आनंद झाल्याचं कपिल देव या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 'गोल्फ कोर्स असो किंवा क्रिकेटटं मैदान पुनरागमन करणं चांगलं असतं. तुम्ही शब्दांमध्ये हे मांडू शकत नाही. गोल्फ कोर्सवर परत येणं, मित्रांसोबत मस्ती करणं आणि खेळणं खूप सुंदर आहे, हेच आयुष्य आहे,' असा संदेश कपिल देव यांनी या व्हिडिओमधून दिला आहे. कपिल देव हे क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहेत, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त (434) विकेट आणि 5 हजार पेक्षा जास्त रन केल्या आहेत. 1999 आणि 2000 साली कपिल देव भारताचे प्रशिक्षकही होते. 2010 साली त्यांना आयसीसीने हॉल ऑफ फेमध्ये स्थान दिलं. हरियाणा हरिकेन या नावाने प्रसिद्ध असलेले कपिल देव भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नलही आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या