बॅटिंग-बॉलिंग न करताही पटकावला सामनावीर अन् क्रिकेटमध्ये सुरू झालं नवं युग

बॅटिंग-बॉलिंग न करताही पटकावला सामनावीर अन् क्रिकेटमध्ये सुरू झालं नवं युग

क्रिकेटच्या मैदानातील हा आतापर्यंतचा विक्रम आहे की प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूने सामनावीर पुरस्कार मिळवला.

  • Share this:

क्रिकेट म्हणजे तुफान फटकेबाजी, वेगवान गोलंदाजी... यातही आता झटपट क्रिकेटच्या जमान्यात हा फलंदाजांचा खेळ झाल्याचं म्हटलं जात आहे. क्रिकेटच्या सुरुवातीला तर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचीच जास्त भीती असायची. वेस्ट इंडिजचा संघ तर त्यांच्या भेदक वेगवान माऱ्यासाठीच प्रसिद्ध होता. गोलंदाजासमोर उभा राहणंही फलंदाजांना आव्हानच होतं. हळूहळू हे चित्र बदललं आणि फलंदाजांनीही वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. दरम्यान, या सगळ्यात क्षेत्ररक्षकाकडे मात्र दुर्लक्ष होत होतं. त्यांच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडलं ते दोन क्षेत्ररक्षकांनी. फक्त लक्ष देण्यासाठीच नाही तर त्याचं महत्व अधोरेखित करून क्रिकेटला त्यांची दखलही घ्यायला लावली.

मैदानावर अनेकदा फलंदाजी, गोलंदाजीत एखादा खेळाडू चमकत नाही. पण एखाद्या सामन्यात त्याच्या क्षेत्ररक्षणाने निकालच बदलतो. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं ते यासाठीच. तर याच क्षेत्ररक्षणात अलिकडच्या काळातला सर्वांच्या ओळखीचा दिग्गज चेहरा आहे तो दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टि ऱ्होड्सचा. पण त्याच्याही आधी गस लोगी नावाचा खेळाडू होता ज्याने क्षेत्ररक्षणात मैदान गाजवलं होतं.

गस लोगी वेस्ट इंडीजचा खेळाडू होता. त्याने 52 कसोटी आणि 158 एकदिवसीय सामने खेळले होते. मात्र त्याचं नाव फारसं कोणाला माहिती नाही. गस लोगीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त 3 शतकं आणि 30 अर्धशतकं केली पण त्याने अशी कामगिरी केली ज्याने क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे असलेल्या विचारांना बदलून टाकलं.

जगातील पहिला असा खेळाडू ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सामनावीरचा पुरस्कार पटकावला तो म्हणजे गस लोगी. 28 ऑगस्ट 1986 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत विंडीज विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला होता. त्या सामन्यात लोगीने 3 जबरदस्त झेल टिपताना 2 फलंदाज धावबाद केले होते. पाकिस्तानच्या अर्ध्या संघाला तंबूत पाठवण्याची किमया यातून झाली होती.

पाकिस्तानच्या सलीम युसुफ, मुदस्सर नजर आणि एजाज अहमद या फलंदाजांना त्याने झेल घेऊन तंबूत धाडलं होतं. तर जावेद मियादाद आणि आसिफ मुजतबा यांना धावबाद केलं होतं. यामुळे पाकिस्तान संघाला 143 धावाच करता आल्या. त्यानंतर विंडिजने हा सामना 9 गडी राखून जिंकला. या सामन्यात गस लोगीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती तसेच गोलंदाजीही केली नव्हती. मात्र तरीही त्याला सामनावीर पुरस्कार देण्याता आला होता.

गस लोगीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टि ऱ्होड्सने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फलंदाज इंजमाम उल हकला ज्या पद्धतीने बाद केलं ते आजही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत. आतापर्यंत एकही क्रिकेटपटू करू शकलेला नाही अशी कामगिरी क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टि ऱ्होड्सने केली आहे.

एका प्रथम श्रेणी सामन्यावेळी जॉन्टिला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नव्हती. तो बदली फलंदाज म्हणून मैदानात उतरला आणि असा पराक्रम केली की आजपर्यंत तो कोणालाही करता आलेला नाही. त्या सामन्यात जॉन्टि ऱ्होड्सने 7 झेल घेतले होते आणि त्याबद्दल सामनावीर पुरस्कारही पटकावला. क्रिकेटच्या मैदानातील हा आतापर्यंतचा विक्रम आहे की प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूने सामनावीर पुरस्कार मिळवला.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा 5 झेल घेण्याची कामगिरी जॉन्टि ऱ्होड्सने केली आहे. त्याने फक्त सामने जिंकून देण्यात भूमिका बजावली नाही तर क्रिकेटमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक होण्याची प्रेरणाही खेळाडूंना दिली.

इंझमाम उल हकला जॉन्टि ऱ्होडसने धावबाद केल्यानंतर सगळेच चकीत झाले होते. पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: December 15, 2019, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading