ओव्हल, 5 सप्टेंबर : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा नेहमीच त्याच्या वेगवान बॉलिंगनं सर्व प्रश्नांची उत्तर देत असतो. बुमराह हा टीम इंडियाचा 'मॅच विनर' बॉलर आहे. पण काही वेळा तो देखील फ्लॉप ठरला. त्यामुळे टीम इंडियाची चॅम्पियन होण्याची संधी हुकली. वर्ल्ड कप 2019 ची सेमी फायनल (World Cup 2019) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) ही याची मुख्य उदाहरणं आहेत.
या दोन मोठ्या पराभवानंतरची वेदना बुमराहनं पहिल्यांदाच बोलून दाखवली आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बुमराहनं या दोन मोठ्या स्पर्धेत शेवटच्या क्षणी झालेल्या पराभवाचा अनुभव सांगितला आहे.
वर्ल्ड कप सेमी फायनलच्या पराभवाबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, ' या पराभवानंतर अन्य खेळाडूंप्रमाणेच मी देखील दु:खी झालो होतो. मला यामधून बाहेर पडण्यासाठी 3-4 दिवस लागले. मी घरी परतल्यानंतरही माझ्या डोक्यात सेमी फायनलचा विचार होता. आम्ही चांगला खेळ करत होतो. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. सेमी फायनल मॅच दोन दिवस चालली. धोनी रन आऊट झाल्यानंतर सर्वजण खूप भावुक झाले होते. पण, हा खेळाचा भाग आहे. यामधून तुम्ही खूप काही शिकता. तुम्हाला यामधून लवकरात लवकर पुढं जायचं असतं.'
WTC Final मध्ये काय चूक झाली?
बुमराहला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC Final) एकही विकेट मिळाली नाही. या मॅचमध्ये झालेली चूक देखील त्यानं सांगितली. 'ती फायनल आणि सध्या सुरू असलेली इंग्लंड विरुद्धची सीरिज यामध्ये खूप फरक आहे. मी त्यावेळी खूप विचार करत होतो. माझ्या मनात परिणाम काय होईल याचा विचार जास्त येत होता.
Twitter च्या मैदानात शमीच्या यॉर्करवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड! जाणून घ्या काय आहे प्रकरण
मी तांत्रिकदृष्ट्या बरोबर होतो. पण माझ्या मनात विचार खूप सुरु होते. त्या फायनलनंतर मी वर्तमानात जगायचं ठरवलं. तसंच भविष्याबद्दल विचार करणे थांबवले. मी मॅचपूर्वीच स्वत:वर खूप दबाव टाकत होतो.' असे बुमराहनं यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.