मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) ही अत्यंत महत्त्वाची लढत होणार आहे. या मॅचवर दिल्लीसह रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) टीमचं भवितव्य अवलंबून आहे. दिल्लीनं हा सामना गमावला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल आणि आरसीबी 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करेल.
दिल्ली कॅपिटल्सनं या सिझनची सुरूवात विजयानं केली होती. पण, त्यानंतर त्यांची गाडी घसरली. आता त्यांना 'प्ले ऑफ' साठी शेवटच्या मॅचपर्यंत वाट पाहावी लागत आहे. दिल्लीनं मागील 4 पैकी 3 सामने जिंकत फॉर्म परत मिळवला आहे. पण, या टीममध्ये दोन मोठ्या अडचणी आहेत. कॅप्टन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॉर्म आणि फास्ट बॉलर्समध्ये सातत्याचा अभाव या दोन कारणांमुळे दिल्ली अडचणीत सापडली आहे. मुंबई इंडियन्सवर विजय मिळवण्यासाठी त्यांना या दोन अडचणींवर मात करावी लागेल.
दिल्लीच्या खलिल अहमदचा अपवाद वगळता एकाही फास्ट बॉलरची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. खलिलनं 9 मॅचमध्ये 18.18 च्या सरासरीनं 16 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीचा प्रमुख बॉलर एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे सुरूवातीचे सामने खेळू शकला नाही. फिट झाल्यानंतर त्याच्या बॉलिंमधील भेदकपणा अद्याप दिसलेला नाही. त्यानं 5 मॅचमध्ये 25.71 च्या सरासरीनं फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूरनं 13 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या असल्या तरी 10 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं रन दिले आहेत.
दिल्लीची दुसरी अडचण कॅप्टन पंतचा फॉर्म आहे. पंतनं दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरच्या खालोखाल सर्वाधिक (301) रन केले आहेत. पण, त्याला या सिझनमध्ये अद्याप अर्धशतक झळकावता आलेलं नाही, चांगल्या सुरूवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात पंत अयशस्वी ठरलाय. त्यामुळे लोअर ऑर्डरवर अतिरिक्त दबाव वाढला आहे.
IPL 2022, MI vs DC Dream 11 Tips: आयपीएलमधील सर्वात चुरशीच्या मॅचमध्ये 'या' खेळाडूंवर आजमवा भविष्य
मुंबई इंडियन्स विरूद्ध पंतसमोर जसप्रीत बुमराहचं आव्हान असेल. पंतला बुमराहनं 12 इनिंगमध्ये 6 वेळा आऊट केले आहे.या फॉर्मेटमध्ये पंतची सर्वात जास्त वेळा बुमराहनंच विकेट घेतली आहे. आता टीमसाठी 'करो वा मरो' लढत असल्यानं पंतसमोर बुमराहचे आक्रमणही परतून लावण्याचं अवघड आव्हान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, Rishabh pant