मुंबई, 8 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2020) युएईमध्ये खेळवली गेली. यानंतर आता पुढच्या वर्षीची आयपीएल कुठे होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. बीसीसीआय (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या वर्षीची आयपीएल भारतातच एप्रिल-मे महिन्यात होईल, असं गांगुली म्हणाला आहे. याचसोबत भारतात इंग्लंडविरुद्धची सीरिज फेब्रुवारी महिन्यात होईल, असं गांगुलीने सांगितलं आहे.
पुढच्या वर्षातली आयपीएल भारतात खेळवण्यासाठी बीसीसीआय तयार असेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे. सौरव गांगुली इंडिया टुडेशी बोलत होता. 'युएई फक्त आयपीएल पुरतच मर्यादित होतं. इंग्लंड भारत दौऱ्यावर येईल, तसंच रणजी ट्रॉफीलाही भारतामध्ये सुरुवात होईल. यासाठी आम्ही बायो बबल तयार करू,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.
'नोव्हेंबर महिन्यापासून गोव्यात आयसीएल सुरू होत आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही. आयपीएलमुळे बरीच मदत झाली,' असं गांगुली म्हणाला आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.
याचसोबत गांगुलीने महिला क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआय कटिबद्ध असल्याचं सांगितलं. पुढच्या दोन वर्षांमध्ये महिलांची आयपीएल सुरु होईल, असं वक्तव्य गांगुलीने केलं आहे. यावर्षी युएईमध्ये महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये तीन टीम खेळल्या होत्या.
'सध्या महिलांच्या आयपीएलमध्ये फक्त 3 टीम आहेत. पण पुढच्या 2 वर्षांमध्ये 7 ते 8 टीम असतील. आयपीएलसारखंच महिलांचंही फ्रॅन्चायजी क्रिकेट सुरू होईल, 'असा विश्वास गांगुलीला आहे.
'महिला क्रिकेटलाही आता चांगले दिवस आले आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप फायनलला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 80 हजार प्रेक्षक आले होते. पुरुषांच्या फायनलएवढीच ही संख्या होती. मागच्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमनी चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या प्रतिभेला संधी देणं महत्त्वाचं आहे. महिला क्रिकेट आता यापेक्षा मोठंच होईल', असं मत गांगुलीने मांडलं.