सुरेश रैना पडला भज्जीच्या पाया, IPL 2021 या हंगामातील एक अनोखा क्षण, पाहा VIDEO

सुरेश रैना पडला भज्जीच्या पाया, IPL 2021 या हंगामातील एक अनोखा क्षण, पाहा VIDEO

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा (IPL 2021) 14 वा सिझन सध्या रंगात येत आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स हा सामनाही अटीतटीचा झाला. या सामन्या दरम्यानचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल: आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा (IPL 2021) 14 वा सिझन सध्या रंगात येत आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स हा सामनाही अटीतटीचा झाला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 3 बाद 220 रन्सचा डोंगर उभारला. त्याला प्रत्युत्तर देताना कोलकात्याची अवस्था 5 बाद 31 अशी झाली होती, पण त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांनी झुंजार खेळ करत संघाला विजयाच्या जवळ म्हणजे 200 रन्सपर्यंत पोहोचवलं. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीमनी मिळून 400हून अधिक रन्स केले.

मॅचमधल्या रायव्हलरीसाठी दोन्ही संघातील खेळाडू जीवाची बाजी लावतात हे अनेक आयपीएल मॅचमध्ये दिसून आलं आहे. हे खेळाडू मॅचमध्ये आक्रमक असले तरीही सामाना संपल्यानंतर ते एकमेकांचे मार्गदर्शक, मित्र असतात. परस्परांना आदर देतात आणि अनेक गमतीजमती करत त्यांचा आनंद लुटत असतात हीच तर आयपीएल क्रिकेट स्पर्धेची खासियत आहे.

बुधवारी वानखेडे स्टेडियमवरही अशीच एक घटना कॅमेरात कैद झाली. हा व्हिडीओ एकाने ट्विटरवर शेअर केला. सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नईचा सुरेश रैना बॅट घेऊन मैदानात आला. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू गोल उभे होते. त्यात हरभजन सिंगही होता. रैना हरभजनाच्या जवळ गेला आणि त्याने खाली वाकून हरभजनला नमस्कार केला. हरभजनला ते जरासं अवघडल्यासारखं झालं त्यांनी रैनाला रोखण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी दोघांनी मिठी मारली.

(हे वाचा-IPL 2021 : मुंबई-पंजाबच्या 2 खेळाडूंमध्ये टशन, जुन्या भांडणाचा बदला घेणार!)

रैना आणि भज्जीमधला हा क्षण सर्वांनी टीव्हीवर पाहिला. त्यानंतर कॉमेंट्रेटरमध्येही या क्षणाची चर्चा झाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, ‘रैनानी केलं ते अगदी बरोबर आहे कारण रैना आणि हरभजनसिंग गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत. भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघातही दोघं होते त्यामुळे त्यांची केमिस्ट्री अशीच असते. मैदानाबाहेर त्यांच्या गमतीजमती सुरूच असतात. हरभजन सिंग रैनाला फारसा सीनिअर नाहीये. त्यांच्यात तसं सीनिअर ज्युनिअर असं नातं पण नाही आहे. पण असंच रैनानी हरभजनबद्दल आपला आदर व्यक्त केला.’

बुधवारी झालेल्या सामन्यात सुरुवातीला फाफ ड्युप्लेसीच्या 95 आणि ऋतुराज गायकवाडच्या 64 रन्सच्या जोरावर चेन्नईने 3 बाद 220 धावा केल्या होत्या. कोलकात्याच्या आंद्रे रसेलने 54, कमिन्सने 66 आणि कार्तिकने 40 रन करून त्यांना कडवं प्रत्युत्तर दिलं पण ते विजय साकारू शकले नाहीत. सामन्यानंतर चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनी म्हणाला, ‘ अशा सामन्यात मनाने शांत रहाणं सोपं आहे. 15-16 व्या ओव्हरनंतर फास्ट बॉलर आणि बॅट्समन यांच्यातच सामना सुरू होता. मी वेगळी फिल्डिंग लावू शकत नव्हतो किंवा इतर काही करू शकत नव्हतो.

त्यामुळे मी शांत होतो. समोरच्या टीमने त्यांच्या नियोजनाचं अधिक चांगलं एक्झिक्युशन केलं असतं तर कदाचित ते जिंकू शकले असते. त्यांच्या हातात जास्त विकेट्स असल्या असत्या तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता. मग त्यांना पूर्ण 20 ओव्हर खेळण्याची गरज पडली असती का हेही सांगता आलं नसतं.’ त्यामुळे खेळाडूंच्या सामन्यातील आणि त्यानंतरच्या वर्तनामुळे अनेक गमतीजमती घडतात आणि सध्या त्याचा आनंद टीव्हीमुळे सर्वसामान्यांना घेता येतो.

First published: April 23, 2021, 5:26 PM IST
Tags: IPL 2021

ताज्या बातम्या