मुंबई, 7 मे: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासाठी
(BCCI) सर्वात महत्त्वाची असलेली आयपीएल स्पर्धा
(IPL 2021) बायो बबलमध्ये
(Bio Bubble) कोरोनाचा उद्रेक झाल्यानं स्थगित करावी लागली. या स्पर्धेची सुमारे महिनाभर आधीपासून तयारी सुरु होती. त्याचबरोबर आयपीएलशी संबंधित सर्वांसाठी बीसीसीआयनं कठोर नियामवली जाहीर केली होती. तरीही स्पर्धा स्थगित करण्याची वेळ ओढावली. 'हे सर्व का घडलं?' याचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.
असुरक्षित बायो बबल
आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या काही खेळाडूंशी 'पीटीआय'नं चर्चा केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. 'भारतामधील आयपीएल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेलं बायो-बबल हे युएई
(UAE) इतकं सुरक्षित नव्हतं.' अशी माहिती एका खेळाडूनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. युएईमध्ये आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र स्पर्धा सुरु झाल्यानंतर एकालाही कोरोनाची लागण झाली नाही.
या खेळाडूनं दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय आणि सर्व आयपीएल टीमनं त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केले. मात्र हे बायो बबल युएई इतके सुरक्षित नव्हते. इथं आम्ही लोकांची ये-जा पाहू शकत होतो. मी काही जणांना स्विमिंग पूलचा वापर करतानाही पाहिलं आहे. सराव करण्याचं ठिकाण देखील दूर होतं.'' असा गौप्यस्फोट या खेळाडूनं केला आहे.
'खेळाडू घाबरले होते'
सनरायझर्स हैदराबादाचा
(SRH) खेळाडू श्रीवत्स गोस्वामी
(Shreevats Goswami) यानं आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मनस्थितीचं वर्णन केलं आहे. " बायो-बबलमध्ये आमची नीट काळजी घेतली जात होती. कोणत्याही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफनं नियम मोडला नाही. मात्र बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक जण विशेषत: विदेशी खेळाडू अस्वस्थ होते, हे मी नाकारत नाही '' असं गोस्वामीनं सांगितलं.
गोस्वामी पुढे म्हणाला की, "माझी प्रतिकार शक्ती चांगली आहे, हे मला माहिती होतं. दुर्दैवानं मला व्हायरसची लागण झाली तर मी नीट होईल हे मला माहिती होतं. पण माझ्या वृद्ध आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असती तर काय झालं असतं? बायो-बबलमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानंतर बहुतेक खेळाडू घाबरले होते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण होऊ नये, असंच प्रत्येकाला वाटत होतं.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला...
बाहेरच्या जगात काय घडत आहे, हे आम्हाला माहिती होतं. ऑक्सिजनची कमतरता, हॉस्पिटलमधील अपुरे बेड्स यामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे समजल्यानंतर वाईट वाटतं. विशेषत: विदेशी खेळाडू याबाबत ट्विटरवर (Twitter) वाचून घाबरले होते. त्यावेळी सर्व परिस्थिती सामान्य होईल अशी आम्ही त्यांची समजूत काढत असू." असं गोस्वामीनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.