मुंबई, 25 एप्रिल : जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलर समजले जाते. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेतल्या आहेत. बुमुराहनं ही कामगिरी 11 टेस्टमध्ये केली आहे. हरभजन सिंग (Harbhajan Singh), इरफान पठाण (Irfan Pathan) यांच्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय आहे. त्याचबरोबर बुमराहला 'डेथ ओव्हर्स'मधील सर्वोत्तम बॉलर मानलं जातं. या सर्वांनंतरही मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) बुमराहपेक्षा अनेक बाबतीमध्ये चांगला बॉलर आहे, असं मत माजी भारतीय फास्ट बॉलर आशिष नेहरानं (Ashish Nehra) व्यक्त केलं आहे.
काय म्हणाला नेहरा?
आशिष नेहरानं 'क्रिकबझ' शी चर्चा करताना सांगितलं की, "गेल्या तीन-चार वर्षांमध्ये प्रत्येक जण बुमराहबद्दल बोलतो.तो चांगला बॉलर आहे. यामध्ये कोणतीही शंका नाही. तुम्ही स्किलचा विचार केला तर माझ्या मते सिराज त्याच्यापेक्षा कमी नाही. काही असे बॉलर आहेत, ज्यांचा तुम्ही वन-डे किंवा टी 20 टीममध्येच समावेश कराल. मात्र सिराजनं प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली बॉलिंग करु शकतो. त्याच्यात गुणवत्तेची कमी नाही. त्याच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. तो याबाबतीत बुमराहच्या देखील पुढं आहे."
तर सिराज खूप पुढं जाईल...
नेहरानं पुढं सांगितलं की, "सिराजकडं वेग आहे. त्याला वेगळ्या पद्धतीनं स्लो बॉल कसा टाकायचा हे देखील माहिती आहे. तो नवा बॉल स्विंग करु शकतो. त्याला एक बॉलर म्हणून फिटनेस आणि डोकं आणखी शार्प केलं पाहिजे. तो यामध्ये यशस्वी झाला तर खूप पुढं जाईल."
सिराजची IPL 2021 मधील कामगिरी
सिराजनं या आयपीएलमधील (IPL 2021) 4 मॅचमध्ये 6.06 च्या इकॉनॉमी रेटनं एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. 27 रन देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं राजस्थान रॉयल्स विरुद्ध (RR) ही कामगिरी केली होती. सिराजनं त्या मॅचमध्ये जोस बटलर, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया यांना आऊट करत आरसीबीच्या विजयाचा पाया रचला होता. त्याचबरोबर सिराजनं सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसरिकडं बुमराहनं या आयपीएलमधील 5 मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2021: सचिन तेंडुलकरच्या सल्ल्याचा CSK च्या बॉलरला फायदा! पाहा Video
सिराजनं मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मालिकेत तो भारताकडून सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर होता. सिराजनं आजवर 5 टेस्टमध्ये 16 विकेट्स घेतल्या असून 3 टी20 मध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Jasprit bumrah