अबु धाबी, 28 ऑक्टोबर : टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वारंवार धक्के बसत आहेत. इशांत शर्मा आणि रोहित शर्मा हे दुखापतीमुळे आधीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर आहेत, त्यातच आता ऋद्धीमान सहा (Wriddhiman Saha) यालाही दुखापत झाली आहे. मंगळवारी आयपीएल (IPL 2020)च्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सहाने वादळी खेळी केली. या सामन्यादरम्यान सहाला दुखापत झाली. बीसीसीआयची मेडिकल टीम सहाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या खेळाडूंच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवते.
ऋद्धीमान सहा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या टेस्ट टीमचा भाग आहे. सहाने दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये 45 बॉलमध्येच 87 रन केले. या खेळीनंतर सहा विकेट कीपिंग करायला आला नाही. त्याच्याऐवजी श्रीवत्स गोस्वामीने विकेट कीपिंग केली. ऋद्धीमान सहाच्या मांडीला दुखापत झाल्याचं हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितलं.
बीसीसीआयने भारताच्या राष्ट्रीय टीमच्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत जास्त सतर्क राहा, असं आयपीएलच्या टीमना सांगितलं आहे. सध्या तरी ऋद्धीमान सहाची दुखापत गंभीर दिसत नाही. हैदराबादची पुढची मॅच तीन दिवसानंतर आहे, तोपर्यंत सहा फिट होईल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
पुढच्या दोन मॅचसाठी ऋद्धीमान सहाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. जर हैदराबादची टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचली, तर सहा पूर्णपणे फिट होऊन मैदानात उतरेल. आपण या दुखापतीतून लवकरच बाहेर येऊ, असं सहाने राशिद खानला आयपीएल टी-20 डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.