अबु धाबी, 7 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबाद (SRH)ने बँगलोर (RCB) चा 6 विकेटने पराभव केला. याचसोबत बँगलोरला पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात निराशा आली. तसंच विराट कोहली (Virat Kohli)चं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. या पराभवाला विराट कोहलीने बॅट्समनना जबाबदार धरलं. बॅट्समनना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्याचं विराट म्हणाला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बँगलोरला 131 रनवर रोखलं. एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 56 रनची खेळी केली. हैदराबादकडून केन विलियमसन 50 रनवर नाबाद राहिला, त्यामुळे हैदराबादने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
कुठे चूक झाली?
मॅच संपल्यानंतर बँगलोरचा कर्णधार विराटने चूक कुठे झाली ते सांगितलं. 'पहिल्या इनिंगमध्ये आम्हाला गरजेचा स्कोअर करता आला नाही. आम्ही थोड्या फरकाने हरलो, जर केन विलियमसनला लवकर आऊट करता आलं असतं, तर परिणाम वेगळा असता. आम्ही त्यांच्या बॉलरना त्यांच्या मनासारखी बॉलिंग करु दिली आणि त्यांनी आम्हाला दबावामध्ये ठेवलं,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय
'मागच्या चार मॅच आमच्यासाठी वेगळ्याच राहिल्या. आम्ही थेट फिल्डरच्या हातात शॉट मारले. मोसमात काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झाली. देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली कामगिरी केली, तर युझवेंद्र चहल आणि एबी नेहमीच उत्तम कामगिरी करतात. यावेळी युएईमध्ये सामने होत असल्यामुळे सगळ्यांसाठी परिस्थिती सारखी होती. त्यामुळे यंदाचा मोसम जास्त स्पर्धात्मक झाला,' असं विराट म्हणाला.
वॉर्नर काय म्हणाला?
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने क्वालिफायरमध्ये प्रवेश केल्यानंतर केन विलियमसन आणि त्याच्या बॉलरचं कौतुक केलं. 'मागचे काही सामने आमच्यासाठी आव्हानात्मक होते. आम्हाला पहिले पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-3 टीमना हरवायचं होतं, आता आम्हाला पुन्हा त्यांनाच हरवायचं आहे. आम्ही पहिल्या 6 ओव्हरमध्ये रणनीती बदलली. संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांना 5 ओव्हर दिल्या आणि नटराजन, राशिद खानला मधल्या ओव्हरसाठी ठेवलं. केननं उत्कृष्ठ खेळी केली. न्यूझीलंडसाठी तो बरेच वर्ष हेच काम करत आहे. आमच्या स्पिनरनी मधल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली,' असं वॉर्नर म्हणाला.