Home /News /sport /

IPL 2020 : 'त्याची किंमत 10 कोटी नाही, 1 कोटी पाहिजे', सेहवागचा निशाणा

IPL 2020 : 'त्याची किंमत 10 कोटी नाही, 1 कोटी पाहिजे', सेहवागचा निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात बऱ्याच खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या किंमतीला साजेशी कामगिरी केलेली नाही.

    मुंबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात बऱ्याच खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या किंमतीला साजेशी कामगिरी केलेली नाही. यात सगळ्यात आघाडीचं नाव आहे पंजाबचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell). मॅक्सवेलच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उठत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)नेही मॅक्सवेलच्या खेळावर निशाणा साधला आहे. ग्लेन मॅक्सवेल 10.75 कोटी रुपये मिळण्यासाठी लायक नाही, असं सेहवाग म्हणाला आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवागने मॅक्सवेलवर जोरदार प्रहार केला. 'मॅक्सवेलला आणखी काय पाहिजे? रन बनवण्यासाठी कोणतं व्यासपीठ हवं आहे? दोन विकेट लवकर गेल्यानंतर त्याच्याकडे बॅटिंग करण्याची पूर्ण संधी होती. पहिले बॅटिंग करत असतानाही तो आऊट होतो. प्रत्येक वर्षी लिलावात मॅक्सवेलवर मोठी किंमत लागते, पण नेहमी तो फ्लॉप होतो. तरीही लोकं त्याच्या मागे लागतात, हे समजण्याच्या पलीकडचं आहे,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. 'यानंतरच्या लिलावात मॅक्सवेलची किंमत 10 कोटीवरुन 1 किंवा 2 कोटी होईल. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक 2016 साली लगावलं होतं. मॅक्सवेलने पूरनची साथ दिली असती आणि एक-दोन रन काढून तो खेळपट्टीवर टिकला असता, तरी पूरनने एकहाती मॅच जिंकवून दिली असती. उलट पूरन दबावामध्ये आऊट झाला,' असं वक्तव्य सेहवागने केलं. ग्लेन मॅक्सवेलची समस्या मानसिक ग्लेन मॅक्सवेलची समस्या मानसिक असल्याचं माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक (Mruli Karthik) म्हणाला आहे. 'मॅक्सवेल सध्या मानसिक दबावात आहे. खेळाडू जेव्हा जास्त किंमतीला विकला जातो, तेव्हा त्याच्यावर जास्त दबाव असतो, त्यामुळे त्याची कामगिरी खराब होते. मैदानात गेल्यानंतर खेळाडूने त्याची किंमत विसरली पाहिजे आणि मॅचवर लक्ष दिलं पाहिजे,' असं मत कार्तिकने मांडलं. मॅक्सवेलने यंदाच्या आयपीएलच्या 6 मॅचमध्ये 12 च्या सरासरीने फक्त 48 रन केले आहेत. मॅक्सवेलचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा कमी आहे. या मोसमात त्याला एकही सिक्स मारता आलेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या