दुबई, 7 नोव्हेंबर : आयपीएल जिंकण्याचं बँगलोर (RCB)चं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. त्यामुळे टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)वर टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण विराटला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेत आहेत. गौतम गंभीर (Gautam Gambhir)यानेही विराटला कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला आहे. हैदराबाद (SRH)विरुद्धच्या एलिमिनेटर मॅचमध्ये विराट कोहलीने घेतलेल्या काही निर्णयांमुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मॅचसाठी विराटने टीममध्ये 4 बदल केले. तसंच फक्त 2 फास्ट बॉलरना घेऊन तो मैदानात उतरला. बॅटिंगसाठीही विराट ओपनिंगला आला, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही.
या मोसमात कर्णधारपदच नाही, तर बॅटिंगमध्येही विराट अपयशी ठरला. मागच्या 8 वर्षातला विराटचा यंदाचा सगळ्यात खराब स्ट्राईक रेट होता.
विराटचं अपयश
यावर्षी विराटने 15 मॅचमध्ये 42.36 च्या सरासरीने फक्त 384 रन केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 121.35 एवढा होता. या मोसमात विराटच्या बॅटमधून फक्त 3 अर्धशतकं आली. तर त्याचा सर्वाधिक स्कोअर 90 रन होता. या हंगामात विराट आक्रमकही दिसला नाही, तसंच बॅटिंग क्रमांकावरूनही विराट गोंधळात दिसला.
8 वर्षातला खराब स्ट्राईक रेट
मागच्या 8 वर्षातला विराटचा हा सगळ्यात खराब स्ट्राईक रेट आहे. याआधी 2012 साली त्याचा स्ट्राईक रेट 111.65 एवढा होता. त्यावर्षी विराटने 16 मॅचमध्ये फक्त 364 रन केले होते. 2019 साली विराटने 464 रन, 2018 साली 530 रन आणि 2017 साली 308 रन केले होते.
गंभीरची विराटवर टीका
बँगलोरच्या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने विराटवर आणि त्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे. बँगलोरची टीम तर प्ले-ऑफमध्ये पोहोचायच्या लायकच नव्हती, असं गंभीर म्हणाला. सोबतच बँगलोरने आता विराटऐवजी दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार बनवलं पाहिजे, असं मत मांडलं. गौतम गंभीर मॅचनंतर ईएसपीएन-क्रिकइन्फोशी बोलत होता.