शारजाह, 16 ऑक्टोबर : बँगलोर (RCB)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब (KXIP)चा शेवटच्या बॉलवर विजय झाला. गुरुवारी शारजाहमध्ये झालेल्या या मॅचमध्ये पंजाबने बँगलोरला 8 विकेटने पराभूत केलं. या मॅचनंतर बँगलोरच्या कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. विराटने या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers)ला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं.
तीनच दिवसांपूर्वी एबी डिव्हिलियर्सने शारजाहच्या याच मैदानावर कोलकात्याविरुद्ध 33 बॉलमध्ये नाबाद 73 रनची वादळी खेळी केली होती. त्या मॅचमध्ये एबी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. पण पंजाबविरुद्ध त्याला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. एबी बॅटिंगला आला तेव्हा बँगलोरचा स्कोअर 127-4 एवढा होता. या मॅचमध्ये एबी 5 बॉलमध्ये 2 रन करून आऊट झाला. एबी डिव्हिलियर्स 17 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला, पण त्याला 7व्या किंवा 11व्या ओव्हरमध्येही बॅटिंगला यायची संधी होती. 6 वर्षात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एबी खालच्या क्रमांकावर बॅटिंगला आला.
विराट कोहलीने ही चूक का केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लेग स्पिनरला घाबरून विराटने एबीला बॅटिंगला उतरवलं नाही का? असंही विचारलं जात आहे. 2018 सालच्या आयपीएलपासून एबी डिव्हिलियर्स 8 वेळा आणि विराट कोहली 6 वेळा लेग स्पिनरला आऊट झाले आहेत. त्यातच पंजाबकडून मुरुगन अश्विन आणि रवी बिष्णोई खेळत होते, त्यामुळे विराट पंजाबच्या या रणनीतीमध्ये फसला का?
विराट कोहलीने या सगळ्या टीकेनंतर स्पष्टीकरण दिलं आहे. राईट हॅण्डेड आणि लेफ्ट हॅण्डेड जोडी मैदानात असावी म्हणून आम्ही एबीला खालच्या क्रमांकावर पाठवल्याचं विराटने सांगितलं. 'आपल्याला राईट आणि लेफ्ट हॅण्डेड जोडी ठेवायची आहे, असा संदेश ड्रेसिंग रुममधून आला. अनेकवेळा तुमचे निर्णय योग्य निकाल देत नाहीत, तरीही 170 पेक्षा जास्तचा स्कोअर चांगला होता,' असं विराट म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.