दुबई, 7 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातही बँगलोर (RCB)च्या पदरी निराशा पडली. याचसोबत विराट (Virat Kohli)चं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. हैदराबाद (SRH)विरुद्धच्या एलिमिनेटर मॅचमध्ये बँगलोरचा विजय झाला. बँगलोरच्या या कामगिरीबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar)यांनी परखड मत मांडलं आहे. कर्णधार विराट कोहलीने बॅटने यंदा चांगली कामगिरी केली नाही, हे बँगलोरला ट्रॉफी पटकावता न आल्याचं प्रमुख कारण असल्याचं गावसकर म्हणाले. ते मॅच संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होते.
'विराट कोहलीने स्वत:साठी उच्च स्तर स्थापन करून ठेवला आहे, याची बरोबरी विराटला करता आली नाही. हेच बँगलोरच्या टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकता न आल्याचं प्रमुख कारण आहे. विराट जेव्हा एबी डिव्हिलियर्ससोबत मोठी खेळी करतो, तेव्हा बँगलोर मोठा स्कोअर करते,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
मधल्या ओव्हरमध्ये बँगलोरचा संघर्ष
कोहलीने या मोसमात 121.35 च्या स्ट्राईक रेटने 15 मॅचमध्ये 450 पेक्षा जास्त रन केले आहेत. यावेळी बँगलोरला बहुतेकवेळा मधल्या ओव्हरमध्ये रन करताना संघर्ष करावा लागला. बँगलोरच्या बॉलिंगमध्ये धार कमी होती, त्यामुळे विरोधी टीम वारंवार आव्हान देऊन त्यांच्याविरुद्ध जिंकत राहिल्या, असं गावसकर म्हणाले.
'बॉलिंग कायम बँगलोरची कमकुवत बाजू राहिली आहे. या टीममध्ये फिंचसारखे चांगले टी-20 खेळाडू आहेत, देवदत्त पडिक्कलने चांगली सुरुवात करून दिली, यानंतर विराट आणि एबीदेखील आहेत. त्यामुळे टीमला एक चांगला फिनिशर खेळाडू शोधावा लागेल. शिवम दुबे ही भूमिका बजावू शकतो,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.
हैदराबादविरुद्धचा बँगलोरचा या मोसमातला लागोपाठ पाचवा पराभव होता. सुरुवातीच्या 10 मॅचपैकी 7 मॅच जिंकत बँगलोरने चांगली सुरुवात केली होती, पण स्पर्धेच्या शेवटी विराटची टीम रस्ता भटकली.