दुबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK) च्या पराभवांची मालिका सुरूच आहे. धोनीच्या टीमचा आता बँगलोर (RCB) ने 37 रनने धुव्वा उडवला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 170 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 132 रनपर्यंतच मजल मारता आली. बँगलोरने दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात या मॅचमध्येही खराब झाली. ओपनर फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसन स्कोअरबोर्डवर 25 रन असतानाच माघारी परतले. यानंतर रायुडू आणि जगदीसन यांनी चेन्नईचा डाव सावरायला सुरुवात केली, पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही.
चेन्नईकडून रायुडूने सर्वाधिक 42 रन केले, तर जगदीसन 33 रन करुन आऊट झाला. बँगलोरकडून पहिलीच मॅच खेळणाऱ्या क्रिस मॉरिसने 4 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 3 विकेट घेतले. याचसोबत त्याने एक रन आऊट केला आणि एक कॅचही पकडला. मॉरिसप्रमाणेच वॉशिंग्टन सुंदर यानेही चांगली बॉलिंग करत 3 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. उडाना आणि चहल यांनाही एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण चेन्नईप्रमाणेच बँगलोरच्या बॅट्समननाही संघर्ष करावा लागला. विराट कोहलीने मात्र एकट्याने खिंड लढवत त्याच्या टीमलला 169 रनपर्यंत पोहोचवलं. विराटने 52 बॉलमध्ये 90 रनची नाबाद खेळी केली.
यंदाच्या आयपीएलच्या मोसमातला चेन्नईचा हा पाचवा पराभव आहे. चेन्नईने 7 मॅचपैकी फक्त 2 मॅचच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे बँगलोरने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.