अबु धाबी, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मुळे आयुष्यात संघर्ष करणारे अनेक खेळाडू श्रीमंत झाले. एवढच नाही तर त्यांना जगातल्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळून नाव कमावण्याचीही संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चा खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याची कहाणीही अशीच एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी आहे. वरुण चक्रवर्ती लहान असल्यापासूनच क्रिकेटवेडा होता, पण 17व्या वर्षी दुखापत आणि संधी मिळत नसल्यामुळे तो एखाद्या सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु लागला. शिक्षण पूर्ण करुन वरुण चक्रवर्ती नोकरीही करायला लागला, पण नशिबाने त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आणलं.
चेन्नईमध्ये घेतलं आर्किटेक्टचं शिक्षण
वरुण चक्रवर्तीने 17व्या वर्षी दोनवेळा दुखापत झाल्यामुळे क्रिकेट खेळणं सोडून दिलं. 12वी झाल्यानंतर त्याने 5 वर्ष चेन्नईमध्ये आर्किटेक्टचं शिक्षण घेतलं. शिक्षण संपल्यानंतर त्याने नोकरीही केली, पण या नोकरीमध्ये त्याचं लक्ष लागलं नाही. अखेर 26व्या वर्षी त्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचं ठरवलं. क्रिकेट माझ्या आयुष्यात परत येईल, याचा विचारही मी केला नव्हता, पण हे पुनरागमन माझ्यासाठी यश घेऊन आलं, असं वरुण चक्रवर्ती इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला.

नोकरीसोडल्यानंतर वरुण चक्रवर्ती तामीळनाडू प्रिमियर लीगमध्ये दिसला. या स्पर्धेत त्याने 9 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या. यानंतर वरुण चक्रवर्ती चर्चेत आला. त्यामुळे पंजाबने त्याला 8 कोटी 40 लाख रुपये देऊन विकत घेतलं. मागच्या वर्षी कोलकात्याने त्याच्यावर 4 कोटी रुपयांची बोली लावली.
वरुण चक्रवर्ती ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन टाकतो. कोलकात्याकडून खेळताना यंदा त्याने 7 मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या मोसमातला तो केकेआरचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही आहे.
वरुण चक्रवर्तीने या मोसमात चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचीही विकेट घेतली. रन रोखण्यासाठी किंवा विकेट घेण्याची जेव्हा गरज असेल, तेव्हा केकेआरची टीम वरुणवर विश्वास टाकताना दिसत आहे. चेन्नईविरुद्धची मॅच संपल्यानंतर वरुण चक्रवर्ती धोनीला जाऊन भेटला होता, यावेळी धोनीनेही त्याचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.