अबु धाबी, 18 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात बहुतेकवेळा खेळाडू त्यांच्या हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत येतात. पण आयपीएल (IPL 2020)च्या कोलकाता (KKR) आणि हैदराबाद (SRH)च्या मॅचमध्ये अंपायरने त्यांच्या लूकमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या मॅचसाठी मैदानात उतरलेल्या अंपायर पश्चिम गिरीश पाठक यांची हेयरस्टाईल एखाद्या रॉकस्टारला लाजवेल अशी आहे. पाठक यांची ही हेयरस्टाईल सोशल मीडियावर मात्र लगेचच व्हायरल झाली. राशिद खानचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा अंपायर पाठक यांनी शेवटचे केस कापले होते, अशा मजेदार कमेंट्स त्यांच्या या फोटोंवर येत आहेत.
पश्चिम गिरीश पाठक यांचा जन्म 17 डिसेंबर 1976 साली महाराष्ट्रात झाला. 2014 पासून पाठक यांनी 8 आयपीएल मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे. 2012 साली दोन महिला वनडेमध्येही त्यांनी अंपायरची भूमिका बजावली.
मॅचवेळी घातलं हेल्मेट
2015 साली अंपायरिंग करत असताना हेल्मेट घातल्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. मॅचदरम्यान हेल्मेट घालणारे पश्चिम गिरीश पाठक पहिले भारतीय अंपायर होते. रणजी ट्रॉफी मॅचदरम्यान अंपायर जॉन वर्ड यांना बॉल लागला तेव्हा पाठक स्क्वेअर लेगला उभे होते.
या अपघातानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत केरळ आणि हरियाणामध्ये झालेल्या मॅचवेळीही पाठक हेल्मेट घालून आले होते. फिल ह्यूज्स आणि एका अंपायरचा मैदानात मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेसाठी आपण हेल्मेट घालून अंपायरिंग करण्यासाठी आल्याचं तेव्हा पाठक यांनी सांगितलं होतं.