Home /News /sport /

IPL 2020 : आईने मोल मजुरी करून मोठं केलं, मुलगा गाजवतोय आयपीएल

IPL 2020 : आईने मोल मजुरी करून मोठं केलं, मुलगा गाजवतोय आयपीएल

आयपीएल (IPL 2020) दरवर्षी क्रिकेट विश्वाला नवा तारा देतं. या यादीत आता आणखी एका नव्या क्रिकेटपटूचा समावेश होऊ शकतो.

    दुबई, 30 सप्टेंबर : आयपीएल (IPL 2020) दरवर्षी क्रिकेट विश्वाला नवा तारा देतं. मग तो ऋषभ पंत, संजू सॅमसन किंवा इशान किशन असो. आयपीएलमुळे या खेळाडूंना जगात ओळख मिळाली. या यादीत आता आणखी एका नवोदित क्रिकेटपटूचा समावेश होऊ शकतो. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ला यंदाच्या मोसमाचा पहिला सामना जिंकवून देण्यात टी नटराजन (T Natrajan)ने मोलाची भूमिका बजावली. डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या टी नटराजनने यॉर्कर टाकून हैदराबादला जिंकवून दिलं. नटराजनने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनीस, श्रेयस अय्यर यांच्यासारख्या दिग्गज बॅट्समनना बॉलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 1 विकेट घेतली. नटराजनकडून यॉर्करचा प्रभावी वापर आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगाच्या भेदक यॉर्करची सगळ्यांनाच प्रचिती आहे. बुमराह-मलिंगाप्रमाणेच अनेक बॉलर या अस्त्राचा वापर करतात, पण प्रत्येकालाच अचूक यॉर्कर टाकता येत नाही. पण मंगळवारी नटराजनने एकाच मॅचमध्ये तब्बल 7 यॉर्कर टाकले. या मोसमात एवढे यॉर्कर टाकणारा नटराजन पहिला बॉलर आहे. नटराजनच्या यॉर्करमुळे ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर यांच्यासारख्या बॅट्समनना शेवटच्या काही ओव्हरमध्ये शांतच रहावं लागलं, त्यामुळे हैदराबादचा 15 रनने विजय झाला. कोण आहे टी नटराजन? टी नटराजनने तामीळनाडूकडून फक्त 9 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत, यामध्ये त्याने 27 विकेट मिळवल्या. तर 5 टी-20 मध्ये त्याला 4 विकेट घेता आल्या. नटराजनला 2017 साली किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) ने 3 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण पुढच्याच मोसमात पंजाबने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर हैदराबादने नटराजनला हैदराबादने 40 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. 2020 साली हैदराबादने नटराजनला रिटेन केलं. गरीब कुटुंबात जन्म नटराजनचा जन्म तामीळनाडूच्या चिन्नापाम्पटी गावात गरीब कुटुंबात झाला. नटराजनची आई मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. हलाखीच्या परिस्थितीमध्येही नटराजनला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही. नटराजनला टेनिस बॉल क्रिकेट खेळायची हौस होती. तेव्हाच प्रशिक्षक जयप्रकाश यांनी नटराजनला बघितलं आणि त्यानंतर त्याला तामीळनाडू प्रिमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. नटराजन त्याच्या आयपीएल टीमच्या जर्सीवर प्रशिक्षक जेपी यांचं नाव लिहितो. नटराजनला 3 भाऊ-बहिण आहेत. आपल्या बहिणींना चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्यायची नटराजनची इच्छा आहे. नटराजनने आयपीएलमधून मिळालेल्या पैशांमधून घर तर घेतलं, पण अजून त्याने गाडी विकत घेतली नाही. महत्त्वाची कामं पहिले करायची आहेत, गाडीनंतर घेता येईल, अशी प्रतिक्रिया नटराजनने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2020, Sunrisers hyderabad

    पुढील बातम्या