अबु धाबी, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ची निवड निश्चित मानली जात होती, पण त्याला संधी न दिल्यामुळे निवड समिती आणि विराट कोहली (Virat Kohli)वर टीका होत आहे.
या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असून त्याने 12 सामन्यांत 155 च्या स्ट्राईक रेटने 362 रन केल्या आहेत. तरीदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये निवड न झाल्याने त्याला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटमध्येदेखील उत्तम कामगिरी केल्याने त्याची भारतीय टीममध्ये निवड करण्याची मागणी अनेक खेळाडूंनी देखील केली आहे.
बुधवारी बँगलोरविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने 42 बॉलमध्ये नाबाद 75 रन करून मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान विराट कोहली सूर्यकुमार यादवच्या दिशेने आला आणि त्याला खुन्नस देत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. पण यावर सूर्यकुमार यादवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, उलट तो तिकडून शांतपणे निघून गेला.
Love u Surya.
That's the way u deal #MIvsRCB pic.twitter.com/8q1mMW0WSF
— HITMAN (@ROxSSR45) October 28, 2020
Here's the full video... SKY pic.twitter.com/QnyF2LYRag
— GYPSY (@sfcunity) October 28, 2020
विजयानंतर सूर्यकुमारने ड्रेसिंग रूमकडे पाहत शांतपणे मी आहे ना,असा इशारा केला. त्यामुळे त्याच्या या कृतीचं कौतुक होत आहे. त्याचबरोबर सामन्याच्या मध्येच विराटने केलेल्या कृतीला देखील कोणतेही प्रत्युत्तर न देता त्याने प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मन जिंकलं, अशा भावना सोशल मीडियावर उमटत आहेत.
या सामन्यात डेल स्टेनने टाकलेल्या 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फटका मारल्यानंतर विराटने फिल्डिंग केली. त्यानंतर ओव्हर संपल्याने विराट कोहली चालत सूर्यकुमारकडे आला आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत उभा राहिला. सूर्यकुमार यादव यानेदेखील त्याच्या नजरेत नजर घालून पहिले आणि तिथून निघून गेला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर हे व्हायरल झालं आणि कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
हा सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार पोलार्डने सूर्यकुमारची लवकरच भारतीय टीममध्ये निवड होऊ शकते असं म्हटलं. त्याचबरोबर त्याला भारतीय टीममध्ये निवड न झाल्याचं दुःख झालंय, अशी प्रतिक्रिया पोलार्डने दिली. आपण आपली चांगली कामगिरी सुरूच ठेवायची, वेळेच्या आधी कुणालाही काही मिळत नाही, असं म्हणत पोलार्डने सूर्यकुमार यादवला दिलासा दिला.
दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादव याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. यावेळी बोलताना मेडिटेशनचा आपल्याला शांत राहण्यासाठी खूप फायदा झाल्याचं म्हटलं आहे. मी खूप आधीपासून फिनिशनर म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होतो. मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःवर वेळ दिल्याने मी या सर्व गोष्टी करू शकत असल्याचे देखील त्याने म्हटलं.