आयपीएल (IPL 2020) च्या गुरुवारच्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH) ने राजस्थान (Rajasthan Royals) चा पराभव केला. याचसोबत हैदराबादने मागच्या पराभवाचा वचपा काढला आणि राजस्थानला ट्विटरवर प्रत्युत्तरही दिलं.
दुबई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या गुरुवारच्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH) ने राजस्थान (Rajasthan Royals) चा पराभव केला. याचबरोबर हैदराबादने पहिल्या मॅचमध्ये राजस्थानने केलेल्या पराभवाचा वचपा काढला, तसंच हैदराबादने ट्विटरवरून राजस्थानवर निशाणाही साधला. 11 ऑक्टोबरला या दोन्ही टीममध्ये झालेल्या रोमांचक मॅचमध्ये राजस्थानने हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात सुरुवातीला 5 विकेट गमावल्यानंतर राजस्थानच्या राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी केलेल्या 85 धावांच्या भागीदारीमुळे राजस्थानने विजय मिळवला.
या सामन्यात रियान परागने 26 बॉलमध्ये 42 रनची नाबाद खेळी करत विजयात मोलाची भूमिका बजावली. परागने खलील अहमदच्या बॉलिंगवर सिक्स ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिल्यानंतर बिहू डान्स करत आपला आनंद साजरा केला होता. या मॅचमध्ये राहुल तेवतियाला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला होता.
Hey @Zomato, we’d like to place an order for one LAAAAARGE Hyderabadi Biryani.
राजस्थानने ज्या दिवशी हैदराबादचा पराभव केला, त्यादिवशी जागतिक बिर्याणी दिन होता. त्यामुळे राजस्थानने ट्विटरवर हैदराबादी बिर्याणीची ऑर्डर करणारं ट्विट करत हैदराबादच्या टीमला चिमटा काढला होता. पण हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर त्यांनीही राजस्थानला प्रत्युत्तर दिलं. बिर्याणीची ऑर्डर कॅन्सल करा, आमच्या मित्रांना एवढं तिखट झेपत नाही, त्यापेक्षा डालबाटीची ऑर्डर घ्या, असं ट्विट हैदराबादने केलं.
Cancel the biryani order our friends can't handle the level of spice
गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव करत प्ले-ऑफच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. राजस्थानने ठेवलेल्या 155 रनचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरने वॉर्नर आणि बेयरस्टो यांना लवकर माघारी धाडलं, यानंतर मनिष पांडे याने 47 बॉलमध्ये नाबाद 83 रन आणि विजय शंकरनेही नाबाद 52 रनची खेळी करून हैदराबादला जिंकवून दिलं.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर तर राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे.